सन 2006 साली डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरु झालेला'निर्माण' हा युवांसाठीचा उपक्रम...
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध'ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून तरुणांसाठी विकसित केलेली ही एक शिक्षणप्रक्रिया...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
गेल्या एका महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त दर महिन्याला आपल्यासाठी घेऊन येतील निखिल जोशीjosnikhil[at]gmail[dot]com, केदार आडकर kedaradkar[at]gmail[dot]comव सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी -http://nirman.mkcl.org,http://en.wikipedia.org/wiki/Nirman

Wednesday, 17 January 2018

प्रिय लोकशाही!


प्रिय लोकशाही,
सांग, आम्ही आमच्या भूकेसंग काय खाऊ?
भुकेनं टाचा खुडून मरणाऱ्यांचा आक्रोश खाऊ,
की त्यांच्या अंतविधीसाठी सुतकात घेतलेलं कर्ज खाऊ,
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यानं झाडाला, आडाला टांगलेला फास खाऊ,
की आत्महत्येसाठी मिळणारं सरकारी पॅकेज खाऊ,
शेतकऱ्याला मृत्युचं दार उघडणारा गॅट (GAAT) करार खाऊ
की एखादा डंकेल (DUNKEL) करार,
एखादा डब्ल्यूटीओचा (WTO) करार खाऊ
प्रिय लोकशाही,
शेतकऱ्याच्या मरणाचा झुला झुलवून सांग,
आम्ही आमच्या भूकेसंग काय खाऊ?

दिवसेंदिवस दुःख विस्तारत चाललेली झोपडपट्टी खाऊ,
की झोपडपट्टीत नागवली गेलेली मानवतेची नग्नता खाऊ,
त्या परमोच्च नग्नतेचा स्लमडॉग मिलिनिअर खाऊ,
की माणसांना कुत्रं संबोधून दिलेला ऑस्कर पुरस्कार खाऊ,
प्रिय लोकशाही,
तुझ्या जागतिक नग्नतेचा सिनेमा बघून सांग,
आम्ही आमच्या भूकेसंग काय खाऊ?

ही सुजलाम सुफलाम भूमी जेव्हा भरू शकत नाही,
पापी पोटांची खळगी
तेव्हा खुद्द भारतमाताच उभी राहते,
नाक्यानाक्यावर देहविक्रयाला
त्या रेडलाईट वस्त्यांत उभ्या राहणाऱ्या,
लाखो भारतमातांच्या शरीराची भाड खाऊ,
की बुधवार पेठ, गोकुळनगर, कुंभारवाडा, फॉकलंड रोड आणि गोलपिठातल्या
वासनेच्या बाजारातली राड खाऊ,
प्रिय लोकशाही,
या बाजारात जिवंत काळजानं एक रात्र फेरी काढून सांग,
आम्ही आमच्या भूकेसंग काय खाऊ?

- सचिन माळी

1 comment:

  1. कविता खुपच छान आहे. सोबत यूट्यूब ची लिंक देखिल असू शकली असती

    https://www.youtube.com/watch?v=yyWONsT-RKo

    ReplyDelete