'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 5 September 2017

गडचिरोलीचे ‘परिवर्तन दूत’

संकेत आहेर आणि गजानन अंभोरे (दोघेही निर्माण ७) गडचिरोली जिल्यातील मुलचेरा तालुक्यामध्ये असलेल्या आंबटपल्ली आणि कोठारी ह्या दोन ग्राम पंचायतमध्ये मुख्यमंत्री ग्राम विकास फेलो म्हणून काम करत आहेत. SocialCops मध्ये काम करणारी निर्माण ७ ची आपली मैत्रीण पूजा वेरुळकर ही नुकतीच त्यांच्या गावाला भेट देऊन आली. तिथे तिला काय दिसलं, ते तिच्याच शब्दात...

मी SocialCops नावाच्या कंपनीत काम करते. ही कंपनी डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या संस्थाना IT सपोर्ट पुरवण्याचं काम करते. आमच्या टीमने बनवलेला डॅशबोर्ड ग्राम विकास योजना बनवण्यासाठी ह्या फेलोजना किती उपयोगी आहे हे बघण्यासाठी मी ह्या दोन ग्राम पंचायतींना भेट देण्याचे ठरवले. संकेत आणि गजानन ह्या दोघांची गावे लगतच, पण दोन्ही गावी बस जात नाही. चंद्रपूरपासून २ तासाचा प्रवास करून नुकत्याच रोवलेल्या धानाच्या सुंदर शेतांमधून आणि मग गडचिरोलीच्या दाट जंगलामधून मी आणि संकेत त्याच्या गावी जाऊन पोहोचलो.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस ह्यांच्या Village Social Transformation Mission अंतर्गत २०२० पर्यंत १००० गावांना आदर्श गाव बनवण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. त्यामध्ये विविध CSR आणि Foundations च्या मदतीने हे टार्गेट पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी ह्यावर्षी जवळपास २०० मुख्यमंत्री फेलोजची निवड करण्यात आली. हे फेलोज गावात राहून त्या गावाला आदर्श गाव बनवण्यासाठी काम करणार आहेत. Root level ला काम करण्याची ही उत्तम संधी असल्याने बऱ्याच निर्माणींनी ही फेलोशिप जॉईन केली आहे आणि महाराष्ट्रातल्या विविध गावांमध्ये राहून त्या गावाच्या विकासासाठी ते काम करत आहेत. २-३ आठवड्याच्या यशदाच्या प्रशिक्षणानंतर ते गावात राहायला गेले.
गावाच्या ग्राम पंचायतची इमारत सुंदर होती. बसायला महागड्या खुर्च्या होत्या. बाहेर ग्रामसेविकेची कार उभी होती. मी कल्पना केलेल्या गडचिरोलीच्या आदिवासी गावातील ग्रामपंचायतसारखी ही मुळीच नव्हती. सरपंच आणि ग्रामसेविकेशी संकेतने ओळख करून दिली. गाव PESA अंतर्गत येत असल्याने सरपंच आदिवासी होत्या. आतापर्यंत मी पाहिलेले सरपंच म्हणजे स्वतःला गावाचे राजे समजणारे. पण ह्या सरपंच म्हणजे एका साधारण आदिवासी बाईसारख्या. त्यांच्याशी बोलताना एकूणच त्यांचे अज्ञान आणि गावाच्या विकासाबद्दल उदासीनता दिसून आली. ग्रामसेविकांचा पैशाचा घोटाळा उघडकीस आल्याने तिचेही कामास काही सहकार्य दिसत नव्हते. उदासीन सरपंच, भ्रष्ट ग्रामसेविका ह्या सगळ्यांसोबत काम करणे मला खूप आव्हानात्मक वाटलं आणि हे सगळं सांभाळून गावाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या संकेतचं कौतुक वाटलं. त्याचं राहायचं ठिकाणही खूप साधारण. एक छोटीशी खाट आणि थोडं सामान एवढंच काय ते फर्निचर. गावातील बहुतेक घर कच्चीच होती. घरांमध्ये टॉयलेट असणं तर दूरच. विकास कामांवर खर्च करण्यापेक्षा वेशीवर कमान बनविणे किंवा महागड्या खुर्च्या घेण्यात खर्च झालेला दिसत होता.  
संकेत म्हणाला, “मी काम करत असलेल्या ग्रा. पं. आंबटपल्लीचा आराखडा गडचिरोली जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट ग्राम विकास आराखडा म्हणून निवडला गेला.  हा आराखडा महाराष्ट्र व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनच्या (व्हीएसटीएफ) गव्हर्निंग कौन्सिलच्या तिसऱ्या बैठकीत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि इतर CSR हेड यांना सादर करायचा होता. शेवटी सादरीकरणाच्या आधारावर सर्व जिल्ह्यातून ज्याला चांगले मार्क्स मिळतील त्या ग्रामपंचायतीला ५ लाखाच बक्षीस होतं. मला चांगलं सादरीकरण न करता आल्यामुळे बक्षीस यवतमाळ जिल्ह्यातील ग्रा. पं. ला भेटलं. यासर्व प्रक्रियेतून जाताना, एका गोष्टीचे वाईट वाटलं की, माझ्यात उत्कृष्ट सादरीकरणाचे कौशल्य नसल्याने माझ्या गावातील लोकांसाठी ५ लाख रुपयांचे बक्षिस घेऊन येता नाही आलं. आणि सर्वात महत्त्वाची शिकवण भेटली कि, चांगलं काम करता-करता ते मला चांगल्या पद्धतीने मांडतासुद्धा यायला हवे.”
तिथून पुढे आम्ही दाट जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने भर पावसात गजाननाच्या गावी गेलो. तो त्याच्या क्वार्टरवर घेऊन गेला. तिथे मोबाइलला नेटवर्क नाही. त्यामुळे यूट्यूब, फेसबुकसारखी करमणूक तर नाहीच. एक साधा रेडिओ ठेवलेला होता कोपऱ्यात. त्यावर छान जुनी गाणी लावून गजाननने आमच्यासाठी खास बिनदुधाचा चहा बनवला. एक दिवस इंटरनेटशिवाय न राहू शकणाऱ्या मला, ‘अशा जंगलातील गावात राहण्याचा गजाननला  कंटाळा येत नसेल का?’ असा प्रश्न पडला. मग गजानन त्याच्या कामाबद्दल सांगत होता.
प्रत्येकाच्या ग्राम पंचायतमध्ये ३-४ गाव. रोज वेगळ्या गावांना भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर आवश्यक कृती करणे हे त्यांचं रोजच काम. गावाच्या विकासासाठी बऱ्याच योजना असल्या तरी त्याच्या अंमलबजावणीमध्ये खूप त्रुटी आहेत. गावात गरजूंपेक्षा ग्राम पंचायत सदस्यांच्या ओळखीच्या लोकांना जास्त लाभ मिळतात. हे टाळण्यासाठी आणि गरज आहे त्यांनाच लाभ मिळावा ह्यासाठी ह्या फेलोजनी सुरवातीचे २ महिने घरोघरी जाऊन सर्वे केला. त्यातून मिळवलेल्या डेटाच्या आधारे त्यांनी एक ग्राम विकास योजना बनवली आहे. बरेच फेलोज नवखे असल्यामुळे ग्राम विकास योजना कशी बनवतात ह्याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती. त्यासाठी त्यांना फारसे ट्रैनिंग किंवा रिसोर्सेस मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच जवळपास एक महिना सर्वे डेटा analysis, गावकऱ्यांसोबत चर्चा आणि योजनांचा अभ्यास करून ही ग्राम विकास योजना बनवली आहे.  आता उर्वरित कालावधीत सर्वात महत्त्वाचे म्हणजे केलेलं नियोजन implement करण्याचं काम आहे. 
खरंतर गडचिरोलीच्या जंगलातल्या दोन आदिवासी ग्राम पंचायतमध्ये त्यांना सोडून दिलंय आणि आता ह्यांचा विकास करा असं सांगितलं असं दिसत होतं. पण कसा करायचा ह्यासाठी ना काही सपोर्ट ना काही प्लॅन. तुम्ही ठरवा काय करायचं कसं करायचं. Rural Development, community interaction चे कितीही पेपर्स वाचले, अभ्यास केला आणि औपचारिक प्रशिक्षण घेतलं तरीही प्रत्यक्ष गावात काम करायला गेल्यावर त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. त्यामुळे गावात काम करताना ह्या फेलोजना बऱ्याच अडचणी येतात. राहायचं घर शोधण्यापासून उच्च अधिकाऱ्यांच्या राजकारणापर्यंत सगळंच.
अशा परिस्थितीमध्ये  काम करणं किती अवघड आहे हे त्यांना प्रत्यक्ष भेटून आल्यावरच कळतं. ‘Suffering में ही meaning  है’ हे फेलोज प्रत्यक्ष जगताना दिसतात. म्हणूनच बाहेर रिमझिम पावसाच्या आवाजात, रेडिओवरची जुनी गाणी ऐकत आणि काळा बिनदुधाचा चहा पीत आपल्या दोन निर्माणी मित्रांच्या कामाबद्दल ऐकताना मला अशा चेंज मेकर्सच्या कम्युनिटीचा भाग असल्याचा अभिमान वाटला!
                                                                                                                                                                                                                                                                         पूजा वेरुळकर, निर्माण ७
                                                                                                    poojaverulkar@gmail.com

No comments:

Post a Comment