'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday 30 April 2016

आणि ‘माणूस’ समजू लागला!

मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना,
अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना,
कोणती ना जात ज्यांची, कोणता ना धर्म ज्यांना,
दुःख ओले, दोन अश्रू, माणसांचे माणसांना...”
-          विंदा
            माणसाला माणसासारखे जगायला मिळावे म्हणून झटणाऱ्या एका संस्थेला आम्ही सर्वांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली. जीवनात आलेल्या काही भयाण अनुभवांचा मागोवा घेत, समाजातील काही घटकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची गरज श्री. गिरीश कुलकर्णी सरांनी ओळखली. गिरीश सर आपल्या परीने जमेल तसं काम करत गेले, या कामाची दाखल घेऊन अनेक जणांनी त्यांना हातभार लावण्यास सुरुवात केली आणि इथून अहमदनगर शहरात१९८९ मध्ये स्नेहालयाच्या प्रवासाला सुरुवात झाली.
            आज त्या छोट्याशा रोपट्याचा वटवृक्ष झालेला दिसतोय. आमीर खानच्यासत्यमेव जयतेमधून सर्वांना परिचित झालेल्या स्नेहालायाची भेट अनेक कारणांमुळे आमच्या शिक्षणात मोलाची भर घालणारी ठरली.

            सर्वप्रथम, हिम्मतग्राम या उपक्रमात अन्नाच्या गरजेबाबत थोड्या प्रमाणात का होईना, पण स्वयंपूर्णता आणण्याची धडपड दिसून आली. संपूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीबरोबर इथले व्यवस्थापन अप्रतिम आणि अचूक होते. महत्त्वाचे म्हणजे हा पूर्ण शेती प्रकल्प एच. आय. व्ही. बाधित कुटुंबांतील लोकांनी मिळून केलेला असल्याने त्यांच्या कष्टांबद्दल एक अधिकच आदराची भावना होती.
            ‘१०९८ ही दूरध्वनीद्वारे पोहोचता येणारी मदत सेवा म्हणजे बालकांसाठी एक मदतीची हमी आहे. कधी अल्पवयीन मुलींची देहविक्रीच्या व्यवसायातून सुटका, तर कधी रेल्वेच्या प्रवासात हरवल्यानंतर त्यांना पुन्हा घरी पोहोचवण्यापर्यंत करावे लागणारे प्रयत्न; अशा अनेक समस्या या हेल्प लाईनच्या माध्यमातून सोडवल्या जातात. मीनाताई आणि कृष्णासर यांचे अनुभव त्यांच्याकडूनच ऐकताना त्यांच्या कामातील समर्पणाची मनावर निश्चितच छाप पडली.
            स्नेहांकुर... लहानपणीच पालकांनी टाकून दिलेल्या अनाथ बालकांचा इथे सांभाळ केला जातो. नंतर योग्य वेळी त्यांना सुजाण पालकांकडे दत्तक म्हणून सुपूर्द केले जाते. दत्तक घेण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या संख्येने अर्ज येतात, हे चित्रदेखील तितकंच आल्हाददायक होतं. पण या बरोबरच जास्तीत जास्त संख्येने अनौरस आणि अनाथ अर्भके वाचवून त्यांना स्नेहांकुर सारख्या केंद्रापर्यंत पोहोचवणे तितकेच गरजेचे वाटले.
            कौटुंबिक अत्याचार सहन कराव्या लागणाऱ्या स्त्रियांसाठी एक आश्रय म्हणून सुरु करण्यात आलेला स्नेहाधार हा प्रकल्प. या प्रकल्पातील स्त्रियांच्या समस्येवर खोलवर जाऊन त्यांच्या समुपदेशनापासून कायदेशीर बाबींची काळजी घेणाऱ्या, दोन्ही बाजू तपासून मगच पुढील निर्णय घेणाऱ्या समुपदेशकांच्या विश्लेषणाची नियोजनबद्ध पद्धत आम्हाला खूप काही शिकवून गेली.
            भारत हा आज फक्त खेड्यांचा देश राहिला नसून तो आता झोपडपट्ट्यांचाही देश झालेला आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण गंभीर प्रमाणात आहे. अशा परीस्थितीत या भागातील लहान मुलांच्या शिक्षणात बाधा येऊ नये, या उद्देशाने येथील समाज मंदिरांचे नूतनीकरण करून तेथे लहानग्यांच्या सर्वांगीण विकासाची केंद्रे सुरू करत बालभवन हा प्रकल्प उदयास आला. येथे प्रत्येक बालकाच्या प्रगतीचा उत्तम लेखाजोगा ठेवला जातो. त्यांच्या फुटबॉल संघाची आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेली दखल, निलेश ह्या एका भन्नाट मुलाची डॉक्टर बनण्याची महत्त्वाकांक्षा आम्हाला खूप अचंबित करणारं होतं. शिक्षणाचा एक प्राथमिक उपाय म्हणून वापर करताना सुद्धा त्याच्या दर्जाचे ठेवलेले भान आम्हाला नक्कीच शिकण्यासारखे आहे.
            या सर्व प्रकल्पांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की कामासाठी लागणारी निष्ठा आणि उत्साह हा सर्वांमध्ये सामाईक होता. अजून एक बाब फार विचार करायला लावणारी होती, ती म्हणजे गिरीश सरांनी सगळ्या प्रकल्पांतील व्यक्तींना दिलेले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. इथे कोणीच कोणाला कमी मानत नाही. लागेल तेव्हा आधार अन मार्गदर्शन देण्यात मात्र कोणतीही कमतरता ठेवली जात नाही. घड्याळाकडे न बघता काम करण्याची तयारी कार्यक्षमतेची एक नवी पातळी समोर ठेऊन गेली.
            अशा या स्नेहालायाच्या कार्यपद्धतीचा आदर्श पुढील कामात आम्ही नक्की ठेवू. कोणतेही काम करताना साधने, पैसा, व्यक्तींची संख्या यासोबतच जिद्द आणि निष्ठाही तितकीच महत्त्वाची आहे, हे आता आम्हाला पटलंय...
विवेक पाटील, vivek28patil@gmail.com


No comments:

Post a Comment