'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday 28 February 2016

सेंद्रीय शेती ही शेतीपद्धती का जीवनपद्धती?

नागपूरमधील ८ मित्र-मैत्रिणींचा गट शेतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वर्ध्याला मंदार देशपांडे (निर्माण ४) च्या शेतावर गेला. त्यांना शेतीबद्दल नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि छान ट्रीप पण झाली. त्यातून पुढे काय करायचं हे देखील त्यांनी ठरवलं... रोहीत गणोरकर (निर्माण ६) त्यांच्या या अभ्याससहली बद्दल सांगतोय..
            “दोन महिन्यांपूर्वी पासून नियोजन सुरू असलेली आमची स्टडी टूर व तिची तारीख एकदाची निश्चित झाली. शनिवार दिनांक २३ जानेवारीला नागपूर गटातील मोनित, आशंका, आकाश, शुभम, रोहित, भूपेंद्र, देवयानी आणि वृषभ असे ८ जण वर्ध्याला मदनी (मंदारचे गाव) येथे पोहोचलो. गोपुरीला शेतीवर काम करणारे मित्र गणेश बिराजदार (निर्माण ३) आणि तन्मय जोशी (निर्माण ३) तसेच जळगाव वरून गोपाल गावंडे (निर्माण ६) हेही मंदारच्या घरी आले.
            सर्वांची औपचारिक ओळख झाली. मंदारचे वडील वसंतकाका फोन वरून शेतमजूर मिळत नसल्याबाबत बोलत होते. त्यामुळे आल्या आल्याच शेतकऱ्याच्या जीवनातील एक प्रश्न समजला की शेतमजूर न मिळणे....
            मंदारने या वर्षी शेतात सेंद्रीय पद्धतीने म्हणजे शुद्ध बीजे वापरून रासायनिक खते व कीटकनाशके न वापरता कापूस लावला आहे. आम्ही दोन तास कापूस वेचला. त्यासोबतच सेंद्रीय शेतीमध्ये कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पर्याय जाणून घेतले. तन्मयने कापूस मोजला आणि सर्व गोळाबेरीज करून हिशोब मांडला की आम्ही आठ तास काम करून ५० रुपये कमवू शकलो असतो, आणि अजून काम करून कुशल मजूर झालो तर १०० रुपये कमवू शकतो! मंदारने आम्हाला कापसाच्या बाजारपेठेबद्दल व वर्तमान स्थितीबद्दल सांगितले.
            घर म्हटलं की सिमेंट व विटांचं असंच एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, पण मंदारने वैज्ञानिक तत्त्वांचा विचार करून पारंपरिक पद्धतीने हे घर उत्तम प्रतीची माती, लाकूड व चुना वापरून बांधलंय. कमीत कमी फर्निचरची गरज, घरभर खेळती हवा आणि भरपूर प्रकाश अशा स्वयंपूर्ण व इको फ्रेंडली घराचा एक उत्तम नमुना बघायला मिळाला. घर बनवताना कोपऱ्याचा वापर कसा करून घेता येईल इथपासून ते कमी पाणी लागावं यासाठीची सांडपाण्याची व्यवस्था या गोष्टींचा विचार केला आहे हे प्रत्यक्षात घर पाहिल्यावर लक्षात आलं.
ग्रामसेवा मंडळ व तन्मयची शेती
            आम्ही तन्मय, गणेश व सुजय जिथे शिकतात तिथे म्हणजे ग्रामसेवा मंडळामध्ये गेलो. ग्रामसेवा मंडळाची माहिती, उद्देश व कार्य समजून घेतले.  कीटकनाशकांना पर्यायी व्यवस्था म्हणून तन्मयने वापरलेल्या जुन्या नव्या पद्धती आम्ही समजून घेतल्या. या जागेचे गोपुरी हे नाव गोसंवर्धनामुळे पडले. गायींची निगा, उत्पादन व संवर्धनाबद्दल आम्ही गोशाळेत जाऊन माहिती घेतली. शेंगदाण्यापासून तेल बनवणाऱ्या तेलघाणी पहिल्या. कासापासून धागे काढण्याकरिता विविध यंत्रांचा वापर व खादी कशी बनते हे पाहिले. चरख्याच्या विविध प्रकारांची माहिती घेतली.
            आम्ही जवळच्या साखर कारखान्याच्या खानावळीमध्ये जेवताना, आकाशने प्रश्न विचारला, “हे जेवण किती सुरक्षित आहे?” आम्हाला प्रश्न पडत गेले. भरपूर उत्पादन करणे या उद्देशाने संकरीत बियाणांचा वापर, त्यावर किमान तीन वेळा कीटकनाशकांची, तणनाशकांची फवारणी, या प्रक्रियांनंतर हे विषयुक्त अन्न आपल्या ताटात येते. शेती व्यवस्थेमधील आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा हात तन्मय, गणेश व मंदार ने आम्हाला सांगितला. बियाणे संकरित करणारी कंपनी अव्वाच्या सव्वा भावात बियाणे विकते. त्यापासून तयार झालेले नपुंसक रोप, (ज्याच्या बियांपासून पुन्हा उत्पन्न देणारे रोप निर्माण होणार नाही) पुढे कीटकनाशकांच्या कंपनीची दादागिरी, नंतर येणाऱ्या शेतमालाला दलालांमार्फत भावाची समस्या... असे मिळून शेतकऱ्याला पिकवलेल्या शेतीच्या मानाने खूप कमी उत्पन्न होते.
            आम्हाला कळून चुकलं की आता गरज आहे या दुष्टचक्रातून हळूहळू बाहेर पडण्याची, पर्यायी मार्ग शोधण्याची, निसर्गाच्या व माणसांच्या विरूद्ध नव्हे तर त्यांच्या संगतीने काम करण्याची... संपूर्ण जगाचा जरी विचार नाही केला तरी माझ्या ताटात येणारे अन्न तरी विषमुक्त असावे असा आग्रह धरण्याची..  हा मार्ग म्हणजे सेंद्रीय शेती. विषमुक्त अन्न खाण्याचा एक प्रयत्न...
            ‘सेंद्रीय शेती म्हणजे फक्त रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर न करणेया आमच्या समजुतीला खोडत तन्मय म्हणाला, “सेंद्रीय शेती ही फक्त शेतीपद्धती नसून ती एक जीवनपद्धती आहे.
बीजोत्सव २०१६
            भारतीय प्राकृतिक बिजांचे संरक्षण करणे, विषमुक्त धान्यासाठी ग्राहक-शेतकरी संबंध प्रस्थापित करून सेंद्रीय शेतीला बाजारपेठ मिळवून देणे, शेतकऱ्यांच्या उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, तसेच शेतकऱ्यांचा व ग्राहकांचा मेळावा भरवणे ही उद्दिष्टे  असलेल्या बीजोत्सवचे दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात नागपूरमध्ये आयोजन केले जाते. आम्ही त्यात सक्रीय सहभाग घेऊन शेतकऱ्यांचे विश्व अधिक जवळून समजून घ्यायचे ठरवले आणि त्याद्वारे आम्ही अधिकाधिक लोकांना सेंद्रीय शेतीबद्दल सजग करायचे असा निश्चय केला.

स्रोत: रोहीत गणोरकर, rohitganorkar@gmail.com

No comments:

Post a Comment