'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday 28 February 2016

'आपण ह्यांच्या बाजूने आहोत की त्यांच्या?' यापेक्षाही महत्त्वाचे काही प्रश्न...

३० जानेवारी २०१६ रोजी गुजरातच्या दांडी ह्या गावी 'सर्व भाषा संवाद' हा कार्यक्रम पार पडला. ह्या कार्यक्रमाबद्दल व त्याच्या उद्देशाबद्दल थोडक्यात सांगतेय राही मुझुमदार (निेर्माण ५)...
           
            "नोव्हेंबर २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा ह्या राज्यातील लेखक, कलाकार, आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी 'दक्षिणायन' नावाची मोहीम सुरू केली. ह्या अंतर्गत दिवंगत डॉ नरेंद्र दाभोळकर, कॉ गोविंद पानसरे व डॉ. एम. एम. कलबुर्गी ह्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या बरोबर संवाद साधण्यात आला. 'दक्षिणायन' मोहिमेचा पुढचा टप्पा ३० जानेवारी ला दांडी येथे आयोजित करण्यात येईल असे ठरवले गेले. देशाची विविधता, बहुसांस्कृतिकता, सलोखा व एकात्मता ह्या मूल्यांशी निष्ठा व्यक्त करणे हे ह्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट ठरवण्यात आले.
            ३० जानेवारी २०१६ रोजी दक्षिणायनचा पुढचा टप्पा म्हणून 'सर्व-भाषा-संवाद' हा कार्यक्रम दांडी ह्या गुजरात मधील समुद्रकिनारी वसलेल्या छोट्याश्या गावी पार पडला. 'सर्व-भाषा-संवाद' म्हणजे संवेदनशील व सृजनशील मनांची एक उत्स्फूर्त आणि ऐच्छिक अभिव्यक्तीच होती असा म्हणायला हरकत नाही. कारण ह्या कार्यक्रमाला कुठल्याही संस्थेचे आर्थिक पाठबळ नव्हते की कुठल्या एका विचारधारेने पुरस्कृत केले नव्हते. तसेच हा कार्यक्रम कुठल्याही पक्षाच्या विरोधात नव्हता.
            ह्या दिवशी भारताच्या विविध राज्यांमधून अनेक साहित्यिक, विचारवंत शास्त्रज्ञ, filmmakers दांडी येथे जमले होते. महात्मा गांधींचे नातू राजमोहन गांधी ह्यांपासून ते FTII (Film and Television Institute of India) चा विद्यार्थी राकेश शुक्ला पर्यंत सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दिवसभरात जवळजवळ ४० भाषणे झाली. त्यात अल्पसंख्यांकांच्या समस्या, कट्टरवाद, मानवी हक्क, समाज देशातील कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे अनेक मुद्दे बोलण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सॉक्रेटीस, तुकाराम, गांधी, फुले ते रोहित वेमुला अशी अनेक उदाहरणे देत "डरेंगे नहीं, निर्भय बनेंगे !" असा आशावाद सुमारे ४०० लोकांच्या समूहाने एकमेकांना दिला.
          
  माझ्यासाठी हा खूप समृद्ध करणारा अनुभव होता. पहिल्यांदाच गुजरात राज्यात जायची संधी मिळाली होती आणि तेसुद्धा थेट दांडी येथे - जे ठिकाण फक्त इतिहासाच्या पुस्तकातून माहित होतं गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहामुळे. पुण्याहून निघताना गणेश विस्पुतेंसारखे लेखक, अतुल पेठेंसारखे रंगकर्मी आणि विविध प्रश्नांवर लढणारे अनेक कार्यकर्ते बरोबर होते. अगदी पुण्यात बसमध्ये सुरु झालेला हा अनुभव क्षणाक्षणाला मला नवीन काहीतरी शिकवत होता, विचार करायला भाग पाडत होता. खूपदा आपली आकलन क्षमता कमी पडते आहे की काय असेही वाटून गेले. इतके सारे लेखक, कवी, रंगकर्मी, सिनेमा मेकर्स- भारताबद्दलचे त्यांचे प्रेम आणि काळजी दोन्ही अगदी स्पष्ट दिसत होते. लोकसभेच्या निवडणुकीने आपल्या देशाला एक वेगळ वळण दिलं आहे ह्याची पार्श्वभूमी ह्या कार्यक्रमाला होती ह्यात शंका नाही, पण त्याहून जास्त ह्या सगळ्या बदलात भारताची 'माणूसकी' हरवून जाऊ नये ह्या बद्दलची चिंता होती अस मला जाणवलं. आपण 'ह्यांच्या बाजूने आहोत की त्यांच्या' ह्यापेक्षा आपण आपल्या देशवासीयांना आणि कुठल्याही 'माणसाला' माणसाप्रमाणे वागणूक, व्यक्त होण्याचा हक्क आणि जगायचा अधिकार देतोय का? हे महत्वाचं आहे असं वाटलं. वेगळ्या विचारांना गोळी घालणे' ह्या मार्गाने आपण सुदृढ समाज कधीच निर्माण नाही करू शकत. उलट आपणही त्याच दुर्बळ घटकाचे भाग बनून राहू हे ध्यानी ठेवल पाहिजे.”
स्रोत: राही मुजुमदार, rahmujumdar@gmail.com

No comments:

Post a Comment