'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday 28 February 2016

पुस्तक परिचय

टीचर
मूळ लेखिकासिल्विया अॅश्टन वॉर्नर
मराठी अनुवादअरुण ठाकूर


            सिल्विया ही न्यूझीलंड मधील बालवाडी शिक्षिका. खरे तर तिला शिक्षिका व्हायचं नव्हतं, पण तरी तिला निरुपाय होऊन शिक्षिका व्हावं लागलं. तिने बालवाडीत शिकवत असताना जे वेगळे प्रयोग केले त्याचे अनुभव म्हणजे टीचर. रटाळ आणि नीरस वाटणारं शिक्षण सहज आणि आनंदी बनवण्याचे तिचे प्रयोग होते.
            सिल्वियाच्या बालवाडीमध्ये गोरी (इंग्रज) मुले आणि तेथील आदिवासीमावरीजमातीची मुले एकत्र शिकायची. पुस्तके मात्र गोऱ्या मुलांच्या दृष्टीकोनातून इंग्लंड मध्ये तयार केलेली होती. त्या पुस्तकांशी एकरूप होणे मावरी आदिवासी मुलांना जमत नसे, म्हणून ते अभ्यासात मागे पडत. याचे परिणाम या मावरी मुलांना पुढे शाळेतही भोगावे लागत आणि पर्यायाने ही मुले पुढे शाळेतून बाहेर पडत आणि वाईट मार्गाला लागत.
            मुळातच मावरी मुले ही स्वच्छंदी आणि वर्गात शांतपणे बसून काही शिकणे हे त्यांना न जमणारे काम. त्यांच्या नैसर्गिक स्वभावाच्या ते विरूद्ध होतं. यामुळे ही मुले शाळेत येत नसत आणि आली तरी बेशिस्त, दंगेखोर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे.
            सिल्वियाने मात्र त्यांची संस्कृती समजून घेऊन त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांना त्यांच्या पद्धतीने व त्यांच्या नैसर्गिक स्वभावाला साजेशी अशी शिक्षणपद्धती वापरून त्यांना शिकवायला सुरूवात केली. या शिक्षणपद्धती मध्ये तिने शिकवण्यापेक्षा मुलांच्या स्वतःहून शिकण्यावर जास्ती भर दिला. म्हणून ती या शिक्षणपद्धतीला सहज शिक्षण म्हणते.
            या पद्धतीने शिकवताना तिने सगळ्यात पहिले पाठ्यपुस्तके नाकारली, कारण यातील शब्दांशी मावरी मुले काहीच संबंध जोडू शकत नसत. या पुस्तकातील बहुतेक शब्द हे मृत असतात असं तिचं मत होतं. त्याऐवजी तिने मुलांच्या रोजच्या जगण्यातील महत्वाचे शब्द शोधून मुलांसाठीच्या पायाभूत शब्दावली मध्ये वापरले. ही शब्दावली देखील प्रत्येक मुलाची वेगळी अशी होती आणि ही शब्दावली मुलांनीच बनवलेली होती. या शब्दावलीत त्यांच्या रोजच्या जगण्यातील शब्द असल्याने ते मुलांच्या लगेच लक्षात राहत आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नसे. अशाच प्रकारे सहज शिक्षणपद्धती वापरून तिने मुलांना वाचन आणि लेखन शिकवलं. सहज वाचन शिकवताना ती या पायाभूत शब्दावलीची मदत घेई. सकाळच्या पहिल्या तासात मुलांनी लिहिलेल्या शब्दांचाच वापर ती मुलांना वाचन शिकवताना करायची. सहज लेखन करताना ती मुलांना त्यांच्या आसपास घडणाऱ्या घटनांविषयी लिहायला सांगे. मग सुरूवातीला एका शब्दापासून सुरू होऊन मुलांचे लिखाण पुढे काही दिवसांतच पानभर पसरायचं. या मुळे या लहान वयातच या मुलांना स्वतःला व्यक्त करता यायला लागलं.
            पण मग सहज शिक्षण म्हणजे फक्त मुलांच्या भावविश्वाशी संबंधित गोष्टी वापरून शिकवणे असं होत नाही. मुलांना त्यांच्या कलानुसार शिकवावं लागतं. त्यात मावरींचा नैसर्गिक स्वभाव म्हणजे बेबंद, कोणतेही बंधन न स्वीकारणारा, काहीसा हिंसक असा. ही आव्हाने स्वीकारून त्यांना त्यांच्या पद्धतीने आणि कलाने शिकवण्याचं काम सिल्वियाला करावं लागे. सिल्वियाच्या वर्गात गोंगाट नेहमीचा असे, कारण मुले आपसांत चर्चा करून, खेळून, भांडून, बघून शिकतात असं सिल्वियाचं मत आहे. मुलांना शिकवताना ती निसर्गाचीही मदत घेई. तिच्या बालवाडीत निसर्गात फिरायला जायचा एक वेगळा तासच असायचा. निसर्गाच्या सानिध्यात फिरताना ती मुलांना विविध आकार दाखवून मुलांना गणितातील त्रिकोण, चौकोन, वर्तुळ या संकल्पना समजावून सांगायची.
            मुलांना शिकवताना विविध साधने वापरून शिकवायलाही तिचा विरोध असे. तिच्या म्हणण्यानुसार आयते साधन आणून मुलांना शिकवायचं म्हणजे त्यांच्यातल्या सर्जनशीलतेला मारणे. सर्जनशीलतेला ती सर्वात जास्ती महत्व देई. म्हणून ती म्हणते मुलांना लागणारे साहित्य मुलांनाच तयार करू द्या. त्यासाठी ती वर्गात मुलांना चित्र दाखवून न शिकवता मुलांनाच कागद आणि रंग द्यायची आणि त्यांना चित्र काढायला लावायची.
            हे सगळं करताना तिला आलेले चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव तिने सांगितलेत. हे अनुभव तिने अतिशय उत्स्फूर्तपणे मांडलेत. त्यामुळे सहज शिक्षणपद्धती वापरून शिकवायचं कसं हे मुद्देसूदपणे मांडणं हा पुस्तकाचा उद्देश नाही. मुलांसोबत काम करतानाच्या तिच्या भावनांना तिने या पुस्तकात वाट करून दिली आहे. बालवाडीत शिकवताना त्या मुलांशी ती किती एकरूप होते हे आपल्याला पुस्तक वाचून जाणवतं. ‘त्या मुलांचं आणि माझं जणू काही लग्नच लागलं होतंअसं ती म्हणते आणि म्हणूनच हे पुस्तक वाचताना रटाळ वाटत नाही.
            मुलांसोबत आणि शिक्षणविषयक काम करणाऱ्यांनी नक्की वाचावं असं हे पुस्तकं!

स्रोत: शैलेश जाधव, jadhav.shailesh21@gmail.com

No comments:

Post a Comment