'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday 28 February 2016

सेंद्रीय शेती ही शेतीपद्धती का जीवनपद्धती?

नागपूरमधील ८ मित्र-मैत्रिणींचा गट शेतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वर्ध्याला मंदार देशपांडे (निर्माण ४) च्या शेतावर गेला. त्यांना शेतीबद्दल नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि छान ट्रीप पण झाली. त्यातून पुढे काय करायचं हे देखील त्यांनी ठरवलं... रोहीत गणोरकर (निर्माण ६) त्यांच्या या अभ्याससहली बद्दल सांगतोय..
            “दोन महिन्यांपूर्वी पासून नियोजन सुरू असलेली आमची स्टडी टूर व तिची तारीख एकदाची निश्चित झाली. शनिवार दिनांक २३ जानेवारीला नागपूर गटातील मोनित, आशंका, आकाश, शुभम, रोहित, भूपेंद्र, देवयानी आणि वृषभ असे ८ जण वर्ध्याला मदनी (मंदारचे गाव) येथे पोहोचलो. गोपुरीला शेतीवर काम करणारे मित्र गणेश बिराजदार (निर्माण ३) आणि तन्मय जोशी (निर्माण ३) तसेच जळगाव वरून गोपाल गावंडे (निर्माण ६) हेही मंदारच्या घरी आले.
            सर्वांची औपचारिक ओळख झाली. मंदारचे वडील वसंतकाका फोन वरून शेतमजूर मिळत नसल्याबाबत बोलत होते. त्यामुळे आल्या आल्याच शेतकऱ्याच्या जीवनातील एक प्रश्न समजला की शेतमजूर न मिळणे....
            मंदारने या वर्षी शेतात सेंद्रीय पद्धतीने म्हणजे शुद्ध बीजे वापरून रासायनिक खते व कीटकनाशके न वापरता कापूस लावला आहे. आम्ही दोन तास कापूस वेचला. त्यासोबतच सेंद्रीय शेतीमध्ये कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पर्याय जाणून घेतले. तन्मयने कापूस मोजला आणि सर्व गोळाबेरीज करून हिशोब मांडला की आम्ही आठ तास काम करून ५० रुपये कमवू शकलो असतो, आणि अजून काम करून कुशल मजूर झालो तर १०० रुपये कमवू शकतो! मंदारने आम्हाला कापसाच्या बाजारपेठेबद्दल व वर्तमान स्थितीबद्दल सांगितले.
            घर म्हटलं की सिमेंट व विटांचं असंच एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, पण मंदारने वैज्ञानिक तत्त्वांचा विचार करून पारंपरिक पद्धतीने हे घर उत्तम प्रतीची माती, लाकूड व चुना वापरून बांधलंय. कमीत कमी फर्निचरची गरज, घरभर खेळती हवा आणि भरपूर प्रकाश अशा स्वयंपूर्ण व इको फ्रेंडली घराचा एक उत्तम नमुना बघायला मिळाला. घर बनवताना कोपऱ्याचा वापर कसा करून घेता येईल इथपासून ते कमी पाणी लागावं यासाठीची सांडपाण्याची व्यवस्था या गोष्टींचा विचार केला आहे हे प्रत्यक्षात घर पाहिल्यावर लक्षात आलं.
ग्रामसेवा मंडळ व तन्मयची शेती
            आम्ही तन्मय, गणेश व सुजय जिथे शिकतात तिथे म्हणजे ग्रामसेवा मंडळामध्ये गेलो. ग्रामसेवा मंडळाची माहिती, उद्देश व कार्य समजून घेतले.  कीटकनाशकांना पर्यायी व्यवस्था म्हणून तन्मयने वापरलेल्या जुन्या नव्या पद्धती आम्ही समजून घेतल्या. या जागेचे गोपुरी हे नाव गोसंवर्धनामुळे पडले. गायींची निगा, उत्पादन व संवर्धनाबद्दल आम्ही गोशाळेत जाऊन माहिती घेतली. शेंगदाण्यापासून तेल बनवणाऱ्या तेलघाणी पहिल्या. कासापासून धागे काढण्याकरिता विविध यंत्रांचा वापर व खादी कशी बनते हे पाहिले. चरख्याच्या विविध प्रकारांची माहिती घेतली.
            आम्ही जवळच्या साखर कारखान्याच्या खानावळीमध्ये जेवताना, आकाशने प्रश्न विचारला, “हे जेवण किती सुरक्षित आहे?” आम्हाला प्रश्न पडत गेले. भरपूर उत्पादन करणे या उद्देशाने संकरीत बियाणांचा वापर, त्यावर किमान तीन वेळा कीटकनाशकांची, तणनाशकांची फवारणी, या प्रक्रियांनंतर हे विषयुक्त अन्न आपल्या ताटात येते. शेती व्यवस्थेमधील आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा हात तन्मय, गणेश व मंदार ने आम्हाला सांगितला. बियाणे संकरित करणारी कंपनी अव्वाच्या सव्वा भावात बियाणे विकते. त्यापासून तयार झालेले नपुंसक रोप, (ज्याच्या बियांपासून पुन्हा उत्पन्न देणारे रोप निर्माण होणार नाही) पुढे कीटकनाशकांच्या कंपनीची दादागिरी, नंतर येणाऱ्या शेतमालाला दलालांमार्फत भावाची समस्या... असे मिळून शेतकऱ्याला पिकवलेल्या शेतीच्या मानाने खूप कमी उत्पन्न होते.
            आम्हाला कळून चुकलं की आता गरज आहे या दुष्टचक्रातून हळूहळू बाहेर पडण्याची, पर्यायी मार्ग शोधण्याची, निसर्गाच्या व माणसांच्या विरूद्ध नव्हे तर त्यांच्या संगतीने काम करण्याची... संपूर्ण जगाचा जरी विचार नाही केला तरी माझ्या ताटात येणारे अन्न तरी विषमुक्त असावे असा आग्रह धरण्याची..  हा मार्ग म्हणजे सेंद्रीय शेती. विषमुक्त अन्न खाण्याचा एक प्रयत्न...
            ‘सेंद्रीय शेती म्हणजे फक्त रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर न करणेया आमच्या समजुतीला खोडत तन्मय म्हणाला, “सेंद्रीय शेती ही फक्त शेतीपद्धती नसून ती एक जीवनपद्धती आहे.
बीजोत्सव २०१६
            भारतीय प्राकृतिक बिजांचे संरक्षण करणे, विषमुक्त धान्यासाठी ग्राहक-शेतकरी संबंध प्रस्थापित करून सेंद्रीय शेतीला बाजारपेठ मिळवून देणे, शेतकऱ्यांच्या उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, तसेच शेतकऱ्यांचा व ग्राहकांचा मेळावा भरवणे ही उद्दिष्टे  असलेल्या बीजोत्सवचे दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात नागपूरमध्ये आयोजन केले जाते. आम्ही त्यात सक्रीय सहभाग घेऊन शेतकऱ्यांचे विश्व अधिक जवळून समजून घ्यायचे ठरवले आणि त्याद्वारे आम्ही अधिकाधिक लोकांना सेंद्रीय शेतीबद्दल सजग करायचे असा निश्चय केला.

स्रोत: रोहीत गणोरकर, rohitganorkar@gmail.com

ये रे ये रे पावसा...

"सातपुड्याच्या खोऱ्यात एक बायगन बुआ नावाचं ठिकाण आहे. तेथे महादेवाचं मंदिर आहे. श्रावण सोमवाराला तिथे लोकांची गर्दी असते.
            २४ ऑगस्ट २०१५ ला श्रावण सोमवार होता. मी जळगावच्या काही मंडळी बरोबर तिथे फिरायला गेलो होतो. पहाडातून वाहत येणाऱ्या नाल्याच्या बाजूला आम्ही सर्व बसलो होतो. तेवढ्यात एक आदिवासी मुलगा स्वतःची गुरं व बकऱ्या घेऊन आला. गुरं व बकऱ्यांनी नाल्यातील पाणी प्यायला सुरुवात केली. आमच्या सर्पमित्र शरद दादांनी त्या मुलाला विचारले, “तू कोणत्या गावचा आहेस?”
            “याच गावचा आहे दादा.” त्या मुलाने उत्तर दिले.
            “बकऱ्यांना नेहमी इथेच पाणी पाजतो का?”
            “जानेवरी लोग अठीच पाणी असते दादा. त्याबाद हा नाला सुकते. अन मंग चार किलोमीटर दूर जा लागते ढोरं घेऊन पाण्यासाठी.”
            शरद दादा आमच्याकडे पाहून म्हणाले, “इथे बंधारा बांधायचा, तीन फूटाचा.”
            ही कल्पना घेऊन आम्ही पुढच्या श्रावण सोमवारी तयारीने तिथे पोहोचलो. नाल्याच्या टर्निंग पोइंटची जागा निवडली जेणे करून पाणी डायरेक्ट बंधाऱ्याला आदळनार नाही. श्रमदानाचे पोस्टर लावून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मदतीस प्रवृत्त केलं. पाच तासात तीन फूटाचा बंधारा तयार झाला. पुढच्या सोमवारी येऊन याला आणखी मजबूत करायचं असं सर्वांनी ठरवलं.
            ७ सप्तेंबरला आम्ही पोरं परत तिथे पोहचलो. बंधाऱ्याला खुपसारी दगड लावलीत. लिकेज थांबवण्यासाठी कितीतरी टोपले माती आतल्या बाजूने टाकली.
आता हे पाणी एप्रिल महिन्यालोग राहीन असा अनुमान आय.” एक आदिवासी म्हातारा माणूस बोलला.
            नंतर फेब्रुवारी मध्ये आम्ही बंधारा बघायला गेलो. तिथे काहीच पाणी नव्हतं. जमिनीत ओलावा होता. आदिवासी मुलासोबत बोलल्यानंतर असा माहित पडले की बंधारा बांधल्यानंतर पाऊस पडलाच नाही. दर वर्षी जानेवारी पर्यंत नाला वाहायचा पण या वर्षी ऑक्टोबर मधेच नल्याचं वाहणं थांबलं. सूर्याच्या प्रकोपाने बंधाऱ्यात साठवलेलं पाणी संपलं. यावर्षीसुद्धा आदिवासींची जनावरं जानेवरीपर्यंतच पाणी पेऊ शकले.
            नंतर मी माझ्या गावातली टयूब वेल्सची स्थिती बघितली. २००५ साली ५० फूटावर लागणारं पाणी आता ८० फूटावर लागते. मागच्या १० वर्षात शेतकऱ्यांनी कितीतरी बोर वेल्स बनवल्या. या दराने जर शेतकऱ्याने पाणी उपसलं आणि पावसाने पाठ फिरवली तर...?
            मी सुभाष पाळेकर यांच्या विकसित नैसर्गिक पद्धतीने शेती करायचं ठरवलं आहे. पण बिना पाण्याची शेती कशी करायची? मराठवाड्यासारखी भीषण परिस्थिती माझ्या गावात उद्भवणार का? आणि असा झाल्यास मी काय करू शकतो? हे तीन प्रश्नांनी माझ्या डोक्यात घर करून बसलेत.”

स्रोत: प्रतीक उंबरकर (निर्माण ६),  pratik.umbarkar8@gmail.com

जागतिकीकरणाला प्रतिसाद देणारा सामान्यांचा जागतिक लढा

'ला व्हिया कॅंपेसिना'च्या ब्राझील कार्यशाळेत झालेले गणेश बिराजदारचे शिक्षण...

            आपले वेतन किंवा इतर सुविधांनी समाधानी नसल्यास डॉक्टर, शिक्षक, रिक्षाचालक किंवा अजून कोणीही काय करतात? संप, आंदोलन, असहकार! आपली सेवा न देण्याचा किंवा असहकाराचा अधिकार ही सामान्य माणसांसाठी आपल्या न्याय्य मागण्या मान्य करून घेण्यासाठी एक अत्यंत महत्वाचे साधन आहे. १९७० च्या दशकात अमेरिकेतील काही शेतकरी संघटनांनी अशाच पद्धतीने आपल्या पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी हे असहकाराचे शस्त्र उगारले, आणि बाजारात मक्तेदारी असलेल्या कारगील या कंपनीला आपला शेतमाल न विकता, तो स्वतःच थेट जागतिक बाजारपेठेत विकण्याचा प्रयत्न केला. झालं काय? कारगीलने बदल्यात अर्जेंटिनातून लक्षावधी किलो गहू आयात करून गव्हाचे भाव पाडले आणि या शेतकरी संघटनांना हतबल केले.
      
       आज हेच चित्र जगभरात निर्माण झाले आहे, मूठभर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आर्थिक आणि राजकीय ताकदीच्या जोरावर सर्व थरातील सामान्य माणसाला शक्तीविहीन केले आहे आणि सीमाविहीन बाजारव्यवस्थेच्या रचनेने स्थानिक पातळीवर अशा अन्यायाविरूद्ध लढणे अशक्य केले आहे. त्यामुळे जगभरातील शेतकरी आणि इतर सर्व लहान उद्योजक, कामगार आपली उपजिविका गमावत आहेत. या परिस्थितीविरूद्ध प्रांत किंवा देशाच्या पातळीवर लढा देणे शक्य नाही याची जाणीव झालेल्या जगभरातील विविध संघटनांनी एकत्र येवून १९९३ साली 'ला व्हिया कॅंपेसिना' या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केली. हे आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्य अधिक दृढ व्हावे आणि विविध संघटनांची आजच्या समाज-राजकीय प्रश्नांविषयी 'परस्पर समज' (mutual understanding) तयार व्हावी यासाठी मार्च २०१५ पासून ला व्हिया कॅंपेसिना, ब्राझील मधील भूमीहीन कामगार चळवळ (Movimento do trabalhadoris sem terra, MST) आणि बर्था फाऊंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नातून 'राजकीय संघटकांसाठी राजकीय प्रशिक्षण' हा सुमारे ६ ते ७ आठवड्याचा प्रशिक्षण वर्ग सुरू झाला. हा प्रशिक्षण वर्ग 'एस्कोला नॅशिनॉल फ्लोरेस्तान फर्नांडीस', ग्वारारेमा, ब्राझील येथे दिनांक २६ ऑक्टोबर ते १२ डिसेंबर २०१५ दरम्यान पार पडला. या वर्गात कोरडवाहू गट, विदर्भ सेंद्रीय शेती अभ्यास गट आणि धरामित्र वर्धा यांच्या वतीने गणेश बिराजदारने सहभाग घेतला. या प्रशिक्षण वर्गात यावर्षी २१ देशातील सुमारे ४० संघटनांच्या ६०-६५ प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
            याविषयी आपले झालेले शिक्षण खालील दुव्यावर गणेशने मांडले आहे -

स्रोत: गणेश बिराजदार, gsbirajdar516@gmail.com




पर्यावरणाशी नाते जाणण्याचा (नि जोडण्याचा) प्रयत्न – Earth Connect

पर्यावरणाच्या, परिसंस्थेच्या मूलभूत संकल्पना शाळेच्या मुलांना कृतीतून कशा समजतील? या प्रश्नातून अमृता प्रधान (निर्माण २) च्या मनात Earth Connect ही कल्पना सकारात होती. जानेवारी, २०१६ मध्ये या विषयाची पहिली कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या नियोजनात सक्रीय हातभार लावलेल्या ईशा घुगरी (निर्माण ६) च्या शब्दात या कार्यशाळेविषयी थोडेसे...
           
            “अमृताशी भेट झाल्यावर तिने Earth Connect ची कल्पना मला सांगितली. मी मुलांबरोबर खूप कमी वेळा काम केले आहे. त्यामुळे मला ती कल्पना खूप interesting, पण त्याच बरोबर आव्हानात्मक देखील वाटली. डिसेंबर मध्ये आमचे बोलणे झाल्यावर आम्ही लगेचच कामाला लागलो. दोघींमध्ये विषयांची विभागणी केली आणि आपापल्या कामाला सुरुवात केली.
            १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी आखलेल्या या उपक्रमात पर्यावरणाच्या, परिसंस्थेच्या मूलभूत संकल्पना मुलांना कृतीतून कशा समजतील ह्यावर आमचा भर होता. त्यासाठी आम्ही अनेक खेळ, अनेक कृती तयार केल्या. Terrarium- एक बाटलीबंद पृथ्वी ही संकल्पना मुलांना कृतीतून दाखवावी आणि मुलांनी ती स्वत: करून त्यातून शिकावे असे आम्हाला वाटत होते. बायोगॅस हा प्रकल्प फक्त ग्रामीण भागात नाही तर शहरी भागातही करता येतो, कचऱ्याची विल्हेवाट कशी लाववी हे सर्व मुलांना समजणे महत्वाचे आहे असं वाटलं. तसेच कचरा वेचताना कचरा वेचकांना किती त्रास होतो ह्याचाही अनुभव मुलांना मिळायला हवा, असं वाटलं.
            ३ जानेवारीला सहा मुले आली आणि सत्रे सुरू झाली. पर्यावरण म्हणजे काय, त्याचे घटक कोणते, माणूस हा पर्यावरणाचा कसा भाग आहे, अशा विविध प्रश्नांची उत्तरे मुलांना खेळातूनच मिळू लागली. धनंजय मुळीने खूप सुंदर असे David Attenborough ह्यांचे लघुपट दाखवले. ते बघताना मुले हरखून गेली होती. निसर्गातील गोष्टी कशा घडत गेल्या ह्यावर चर्चाही झाली. श्रीमती वृशाली गंभीर ह्यांनी Terrarium खूपच सुंदर पध्दतीने घेतले. मुलांनी ते तयार करताना वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषणाची माहिती घेतली. आपल्या जवळ एक बाटलीबंद पृथ्वी आहे ह्या आनंदात मुले घरी परतली.
            कचरा ही अतिशय गंभीर समस्या आहे हे मुलांनी डोळ्यांनी पहावे ह्या उद्देशाने १० जानेवारी रोजी आम्ही त्यांना पुणे-सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट येथे घेऊन गेलो. तिथे जाऊन स्थलांतरीत पक्षी म्हणजे काय, त्यांच्या शरीरात कोणते बदल झालेले असतात, कचरा म्हणजे काय, त्याचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो अशा सर्व गोष्टींची माहिती मुलांना पक्षी दाखवून तसेच त्यांच्याबरोबर चर्चा करुन दिली गेली. तेथील थोडा कचरा गोळा करुन कवडीपाटची भेट संपली. त्यानंतर टेरेस गार्डनिंग, बायोगॅस, गांडूळखत प्रकल्प, the story of stuff, अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आणि १० जानेवारीचा दिवस संपला.
            मुलांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून असे समजले की कवडीपाटवरील कृती आणि Terrarium ह्या दोन गोष्टी त्यांना सर्वात जास्त आवडल्या. ह्या संपूर्ण उपक्रमातून मॅनेजमेंट कशी असावी, एखाद्या विषयाची माहिती देताना किंवा एखादे सत्र घेताना ते अजून प्रभावीपणे कसे घेता येईल हे मी शिकले. यात कामात प्रियदर्शन, भक्ती, धनंजय, अमृता, वेदवती, गीता, सायली, सनत, श्वेता आणि गजानन ह्यांची खूप मदत झाली!
            सध्या आम्ही पुढचे Earth Connect घेण्याची तयारी करीत आहोत...”

स्रोत: ईशा घुगरी,  ishaghugari@gmail.com

'आपण ह्यांच्या बाजूने आहोत की त्यांच्या?' यापेक्षाही महत्त्वाचे काही प्रश्न...

३० जानेवारी २०१६ रोजी गुजरातच्या दांडी ह्या गावी 'सर्व भाषा संवाद' हा कार्यक्रम पार पडला. ह्या कार्यक्रमाबद्दल व त्याच्या उद्देशाबद्दल थोडक्यात सांगतेय राही मुझुमदार (निेर्माण ५)...
           
            "नोव्हेंबर २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा ह्या राज्यातील लेखक, कलाकार, आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी 'दक्षिणायन' नावाची मोहीम सुरू केली. ह्या अंतर्गत दिवंगत डॉ नरेंद्र दाभोळकर, कॉ गोविंद पानसरे व डॉ. एम. एम. कलबुर्गी ह्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या बरोबर संवाद साधण्यात आला. 'दक्षिणायन' मोहिमेचा पुढचा टप्पा ३० जानेवारी ला दांडी येथे आयोजित करण्यात येईल असे ठरवले गेले. देशाची विविधता, बहुसांस्कृतिकता, सलोखा व एकात्मता ह्या मूल्यांशी निष्ठा व्यक्त करणे हे ह्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट ठरवण्यात आले.
            ३० जानेवारी २०१६ रोजी दक्षिणायनचा पुढचा टप्पा म्हणून 'सर्व-भाषा-संवाद' हा कार्यक्रम दांडी ह्या गुजरात मधील समुद्रकिनारी वसलेल्या छोट्याश्या गावी पार पडला. 'सर्व-भाषा-संवाद' म्हणजे संवेदनशील व सृजनशील मनांची एक उत्स्फूर्त आणि ऐच्छिक अभिव्यक्तीच होती असा म्हणायला हरकत नाही. कारण ह्या कार्यक्रमाला कुठल्याही संस्थेचे आर्थिक पाठबळ नव्हते की कुठल्या एका विचारधारेने पुरस्कृत केले नव्हते. तसेच हा कार्यक्रम कुठल्याही पक्षाच्या विरोधात नव्हता.
            ह्या दिवशी भारताच्या विविध राज्यांमधून अनेक साहित्यिक, विचारवंत शास्त्रज्ञ, filmmakers दांडी येथे जमले होते. महात्मा गांधींचे नातू राजमोहन गांधी ह्यांपासून ते FTII (Film and Television Institute of India) चा विद्यार्थी राकेश शुक्ला पर्यंत सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दिवसभरात जवळजवळ ४० भाषणे झाली. त्यात अल्पसंख्यांकांच्या समस्या, कट्टरवाद, मानवी हक्क, समाज देशातील कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे अनेक मुद्दे बोलण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सॉक्रेटीस, तुकाराम, गांधी, फुले ते रोहित वेमुला अशी अनेक उदाहरणे देत "डरेंगे नहीं, निर्भय बनेंगे !" असा आशावाद सुमारे ४०० लोकांच्या समूहाने एकमेकांना दिला.
          
  माझ्यासाठी हा खूप समृद्ध करणारा अनुभव होता. पहिल्यांदाच गुजरात राज्यात जायची संधी मिळाली होती आणि तेसुद्धा थेट दांडी येथे - जे ठिकाण फक्त इतिहासाच्या पुस्तकातून माहित होतं गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहामुळे. पुण्याहून निघताना गणेश विस्पुतेंसारखे लेखक, अतुल पेठेंसारखे रंगकर्मी आणि विविध प्रश्नांवर लढणारे अनेक कार्यकर्ते बरोबर होते. अगदी पुण्यात बसमध्ये सुरु झालेला हा अनुभव क्षणाक्षणाला मला नवीन काहीतरी शिकवत होता, विचार करायला भाग पाडत होता. खूपदा आपली आकलन क्षमता कमी पडते आहे की काय असेही वाटून गेले. इतके सारे लेखक, कवी, रंगकर्मी, सिनेमा मेकर्स- भारताबद्दलचे त्यांचे प्रेम आणि काळजी दोन्ही अगदी स्पष्ट दिसत होते. लोकसभेच्या निवडणुकीने आपल्या देशाला एक वेगळ वळण दिलं आहे ह्याची पार्श्वभूमी ह्या कार्यक्रमाला होती ह्यात शंका नाही, पण त्याहून जास्त ह्या सगळ्या बदलात भारताची 'माणूसकी' हरवून जाऊ नये ह्या बद्दलची चिंता होती अस मला जाणवलं. आपण 'ह्यांच्या बाजूने आहोत की त्यांच्या' ह्यापेक्षा आपण आपल्या देशवासीयांना आणि कुठल्याही 'माणसाला' माणसाप्रमाणे वागणूक, व्यक्त होण्याचा हक्क आणि जगायचा अधिकार देतोय का? हे महत्वाचं आहे असं वाटलं. वेगळ्या विचारांना गोळी घालणे' ह्या मार्गाने आपण सुदृढ समाज कधीच निर्माण नाही करू शकत. उलट आपणही त्याच दुर्बळ घटकाचे भाग बनून राहू हे ध्यानी ठेवल पाहिजे.”
स्रोत: राही मुजुमदार, rahmujumdar@gmail.com

या गाडीला ब्रेक नाही . . .

२०१६ च्या सीमोल्लंघनचा हा पहिला अंक. आज थोडा pause घेवून २०१५ अखेरच्या भारताचा एक snapshot घेवूया. लोकसंख्या, प्रदूषण, कचरा, उद्योगधंदे, रोजगार, शिक्षण वगैरे अनेक गोष्टींनी मिळून हा snapshot बनेल. त्यातील फक्त मोबाईल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी चे २०१५ चे चित्र थोडे जवळून पाहू.

मोबाईल आणि इंटरनेट संबंधी काही बोलकी आकडेवारी -

ट्राय (Telecom Regulatory Authority of India - TRAI) च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ३१ डिसेंबर, २०१५ रोजी भारतात-
·         टेलिफोनचे १०३. कोटी ग्राहक आहेत. (भारताची २०१५ अखेर अंदाजे लोकसंख्या - १३२ कोटी)
·         यात १०१ कोटी ग्राहक मोबाईलधारक, तर . कोटी ग्राहक लॅंडलाईनधारक आहेत. (३१ डिसेंबर, २०१० रोजी हे आकडे अनुक्रमे ७३ कोटी . कोटी होते.)
·         मोबाईलधारक ग्राहकांपैकी ४३ कोटी ग्रामीण, तर ५८ कोटी शहरी भारतातील आहेत. (भारताची ग्रामीण लोकसंख्या ~६८%)
·         दर १०० लोकसंख्येमागे असणा-या मोबाईलधारकांच्या एकूण संख्येला mobile teledensity म्हणतात. शहरी भारतात हा आकडा १४७ (एक व्यक्ती एकापेक्षा अधिक सिम कार्ड घेवू शकते), तर ग्रामीण भारतात हा आकडा ४९ आहे. (३१ डिसेंबर, २०१० रोजी हे आकडे अनुक्रमे १४१ ३० होते.)
               
                याचा अर्थ मोबाईलधारकांची संख्या वेगाने वाढत आहे. ग्रामीण भागातील मोबाईलधारकांचे प्रमाण शहरी भागाच्या तुलनेत अधिक वेगाने वाढत आहे. स्मार्टफोनच्या कमी होणा-या किंमती मोबाईल वापराचे कमी होणारे दर यामुळे इंटरनेट त्यामार्फत ज्ञान ग्रामीण भारतात पोचण्याची संधी वाढली आहे. आता भारतातील इंटरनेटची काही आकडेवारी पाहू. (स्त्रोतInternet and Mobile Association of India - IAMAI).

·         डिसेंबर २०१५ अखेर भारतात जवळपास ४० कोटी इंटरनेटचे वापरकर्ते आहेत
·         इंटरनेटचे वापरकर्ते कोटीवरून १० कोटीपर्यंत पोचण्यासाठी एक दशकाहून अधिक काळ लागला. १० कोटीवरून २० कोटीपर्यंत पोचण्यासाठी वर्षे लागली. ३० कोटीवरून ४० कोटीपर्यंत पोचण्यासाठी केवळ वर्ष लागले.
·         डिसेंबर २०१५ अखेर भारतातील इंटरनेटचे तब्बल ३१ कोटी वापरकर्ते मोबाईल फोनवरून इंटरनेट वापरतात. (२२ कोटी - शहरी, कोटी - ग्रामीण) एका वर्षात हे प्रमाण शहरी भागात ७१ % नी तर ग्रामीण भागात ९३ % नी वाढले आहे.

                आपल्याला आवडो किंवा आवडो, मोबाईल इंटरनेट शहरात बहुतेक लोकसंख्येपर्यंत पोचले आहेत, खेड्यापाड्यात अगदी प्रचंड वेगाने पोचत आहेत. 3G मुळे मोबाईलमार्फत इंटरनेटचा वापर खूप सोपा झाला. 3G पासून 5G Internet of Things (मोबाईल फोनच नाही, तर सर्वच उपकरणे इंटरनेटद्वारे एकमेकांना कनेक्टेड असतील) पर्यंतचा मार्ग स्पष्टपणे आखला गेला आहे. मोठमोठ्या उद्योजकांनी यात गुंतवणूक सुरू केली आहे. या गाडीला ब्रेक नाही, रिव्हर्स गिअर नाही. समाजातील समस्या सोडवण्याची इच्छा असणा-या आपल्या सर्वांना या होत असलेल्या बदलाची जाणीव असणे आवश्यक आहे. आपल्या कार्यपद्धतीत त्यानुसार योग्य बदल करणे आवश्यक आहे.

निसरडा रस्ता -
                लहानपणी विटी-दांडू, गोट्या आपण जितक्या सहजपणे हाताळायचो, तितक्या सहजपणे आजची लहान मुले स्मार्टफोन, टॅब्लेट हाताळत आहेत. वयात येणा-या मुलामुलींना भरकटवण्याची खूप मोठी ताकद मोबाईल इंटरनेट मध्ये आहे. स्मार्टफोनच्या व्यसनाकरिता व्यसनमुक्ती केंद्रेही सुरू झाली आहेत.
                इंटरनेटचा वापर खूप वाढला असला तरी अजूनही तो न्याय्य योग्य नाही. इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये ७१% पुरूष : २९% स्त्रिया असे प्रमाण आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ८८% पुरूष : १२% स्त्रिया इतके व्यस्त होते. ग्रामीण भागात करमणूक हेच इंटरनेट वापराचे प्रमुख कारण आहे. त्यानंतर social networking संपर्कासाठी इंटरनेट वापरले जाते. ग्रामीण भागातील ७५% इंटरनेटचे वापरकर्ते १८-३० वयोगटातील आहेत. जर करमणूक हा इंटरनेटचा प्रमुख उपयोग असेल तर त्यापायी खूप मोठी तरूण क्रयशक्ती वाया जाण्याचा धोका संभवतो. माहितीसाठी ज्ञानासाठी इंटरनेट वापरण्याचे प्रमाण खूप कमी आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या भाषेत ज्ञान सहजासहजी उपलब्ध नाही. इंटरनेटवरील जवळपास ५६% माहिती इंग्रजीत आहे, केवळ .% माहिती भारतीय भाषांमध्ये आहे.
               
अडचणींमध्ये लपलेल्या संधी -

                मात्र अडचणी कधीच एकट्या येत नाहीत. त्या आपल्यासोबत आव्हाने आणि संधी घेवून येतात. इंटरनेटवर भारतीय भाषांत माहिती व ज्ञाननिर्मितीची मोठी गरज व संधी आहे. करमणूकीसोबतच माहिती, ज्ञान व आपल्या समस्या सोडवण्यासाठी इंटरनेटचा वापर कसा करता येईल हे आपण कार्यकर्त्यांना शिकून लोकांपर्यंत पोचवण्याची गरज व संधी आहे. सशक्तीकरणासाठी स्त्रियांपर्यंत इंटरनेट पोचवण्याची गरज व संधी आहे. तरूणांमध्ये इंटरनेट वापराचे आकर्षण दिसते, तसेच त्यांच्यात इंटरनेट वापराचे प्रमाणही मोठे आहे. त्यांच्यापर्यंत सामाजिक संदेश पोचवण्यासाठी एक आयता प्लॅटफॉर्म आपण काहीही न करता आपल्याकडे उपलब्ध आहे. ३१ डिसेंबरला दारूच्या मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात. दारूचे संस्कृतीकरण होते. ३१ डिसेंबर, २०१५ ला नायनांनी तरूणांकडून दारूसंबंधी प्रश्न मागवून त्यांची शास्त्रशुद्ध उत्तरे दिली. सोशल मेडियामार्फत ही प्रश्नोत्तरी २ दिवसांत जवळपास ५० हजार लोकांपर्यंत पोचू शकली.
               
'झुंज दुष्काळाशी' या मोहीमेअंतर्गत ऐन मे महिन्याच्या दुपारी जालन्यातल्या शेतात फिरून आम्ही पाणलोट क्षेत्राचे नियोजन करत होतो. शेताची लांबी रूंदी मोजायची होती. शेताच्या कोप-यातले एक झाड सोडले तर नजरेत दूरदूरपर्यंत सावलीसाठी झाडच नव्हते. आम्ही या झाडापासून सुरूवात केली. मेजरींग टेप घेवून आम्ही शेताच्या परीघावरून चालू लागलो. लांबी रूंदी मोजून पुन्हा झाडापर्यंत आम्ही पोचलो तेव्हा पाऊणएक तास उलटून गेला होता. पहिल्या शेतातच आम्ही थकून गेलो. झाडाखाली बसलेला आपला निर्माणचा मित्र अमोघ पांडे मोबाईलमध्ये काही तरी पाहत होता. तो काय करतोय हे सहज उत्सुकतेने पाहिलं. त्याच्या स्क्रीनवर गुगल मॅपच्या मदतीने याच शेताचा नकाशा होता. खाली स्केल होती. स्केलच्या मदतीने आम्ही लांबी रूंदी मोजली. पाऊण तासांच्या पायपीटीनंतर जितकी लांबी रूंदी आम्ही मोजली, जवळपास तितकीच झाडाखाली बसून पाऊण मिनिटात निघाली. इंजिनिअर असून हे सुचलं नाही म्हणून मी खजिल झालो.
                तर मोबाईल आणि इंटरनेटमुळे या अलिबाबाच्या गुहेत दडलेल्या problem solving च्या असंख्य शक्यता ख-या होऊ पाहत आहेत. पण मोबाईल आणि इंटरनेट ही साधने आहेत, साध्य नाहीत याचं भान आजपासूनच ठेवूयात. नाहीतर कासिमप्रमाणे आपण या फसव्या गुहेत शिरू खरे, पण problem solving साठी गरज पडल्यास बाहेर पडू शकणार नाही.
स्रोत: निखिल जोशी, josnikhil@gmail.com