'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 28 April 2015

दंतेवाडा ते चंदीगड

आकाश बडवेचा ६० शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांसोबत राष्ट्रीय जैविक कृषी संमेलनात सहभाग

चंदीगड मध्ये नुकतंच पाचव्या राष्ट्रीय जैविक कृषी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं (२८ फेब्रुवारी ते 2 मार्च) होतं. भारतामध्ये सेंद्रिय आणि शाश्वत शेती या क्षेत्रात काम करणाऱ्या Organic Farmers Association of India (OFAI) आणि Alliance for Sustainable and Holistic Agriculture (ASHA) या दोन प्रमुख संघटना या संमेलनाचं आयोजन दर दोन वर्षांनी करतात. अन्न-पदार्थ विकत घेण्यासाठी कधी थेट शेतकऱ्याकडे जाण्याची गरज न पडल्यामुळे, आणि शेतीविषयी फारशी माहिती नसल्यामुळे आपलं शेती विषयक प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं. पण वास्तविकतः शेतीचे प्रश्न केवळ वैज्ञानिक आणि तांत्रिक नाहीत. समाजातल्या अनेक सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि पर्यावरण विषयक प्रश्नांशी त्यांचा संबंध आहे. या प्रश्नांबाबत जनजागृती व्हावी आणि सेंद्रीय शेती या क्षेत्रात काम करणारे शेतकरी, संस्था, कार्यकर्ते, ग्राहक, वैज्ञानिक आणि Policy Makers यांनी एकत्र येऊन चर्चा करावी, अनुभव वाटावे आणि एकूणच शाश्वत शेतीची चळवळ बळकट व्हावी हा ह्या संमेलनाचा उद्देश.
दंतेवाड्याच्या शेतकऱ्यांसोबत आकाश
या संमेलनामध्ये आकाश बडवे (निर्माण ४) ने दंतेवाडा (छत्तीसगढ) जिल्ह्यातल्या ६० शेतकरी आणि कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांबरोबर सहभाग घेतला. आकाश गेल्या अडीच वर्षांपासून दंतेवाड्यात Prime Minister’s Rural Development Fellow म्हणून काम करतो आहे. आदिवासी शेतकऱ्यांबरोबर काम करत शाश्वत आणि सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून अन्नसुरक्षा, कुपोषण आणि आर्थिक विकास ह्या दिशेने त्याचे काम गेल्या २ वर्षांपासून चालू आहे. सध्या हे काम दंतेवाड्यातल्या ८०० शेतकऱ्यांबरोबर चालू आहे.
योगायोग असा की, २०१५ हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाद्वारे “International Year of Soils for Sustaining Food and Farming Systems” म्हणन घोषित केलं आहे. चंदीगड मध्ये झालेल्या राष्ट्रीय जैविक कृषी संमेलनासारख्या उपक्रमांमुळे शेतीचे प्रश्न आणि त्यावर असलेला शाश्वत शेतीचा उपाय मुख्य प्रवाहासमोर अजून जोमाने येईल ही अशा. 

                                                                      स्त्रोत: आकाश बडवे, akashsbadave@gmail.com 

No comments:

Post a Comment