'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 31 December 2014

गडचिरोलीच्या मलेरियाशी दोन-दोन हाथ

गडचिरोली-पावसाळा-मलेरियाची साथ हे दरवर्षीचं समीकरण. हे समीकरण सोडवण्याची जबाबदारी सर्चचे मोबाईल मेडिकल युनिट सांभाळणाऱ्या भूषण देववर आली. ते सुटले का? ते सोडवण्याची काय प्रक्रिया होती? त्यादरम्यान भूषणचे काय शिक्षण झाले? वाचूया त्याच्याच शब्दांत...

मलेरिया हा गडचिरोली जिल्ह्यासाठी एक मोठा 'थंडी वाजून ताप आणणारा' प्रश्न आहे. २०११-१२ च्या सरकारी आकडेवारीनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या १% पेक्षाही कमी आहे. मात्र महाराष्ट्रातील मलेरियाच्या एकूण रूग्णांपैकी जवळपास १४% रूग्ण गडचिरोली जिल्ह्याचे आहेत. मलेरियाचे प्रामुख्याने Plasmodium-vivax (PV) व Plasmodium-falsiparum (PF) हे दोन प्रकार भारतात आढळून येतात. यापैकी PF मलेरियाचा उपचार जर झाला नाही तर तो जीवघेणा ठरतो. PF मालेरियाचेच रुपांतर cerebral (मेंदू) मलेरिया मध्ये होते, व ह्याच PF मलेरियाचे रूग्ण गडचिरोलीत प्रामुख्याने दिसून येतात (75%). मुंबईत हेच प्रमाण ८% आहे. गडचिरोलीचा मलेरिया chloroquine resistant आहे. (chloroquine हे औषध सामान्यतः मलेरियाच्या उपचारासाठी सर्वत्र वापरले जाते.)
            साधारण पावसाळ्या नंतर मलेरियाचे प्रमाण वाढते. मलेरियाशी दोन हाथ करण्यासाठी मी व सर्चच्या मोबाईल मेडीकल युनिटची (MMU) आमची सर्व टीम सज्ज होतो. ४५ आदिवासी दुर्गम गावांचा मलेरिया नियंत्रण करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता.
            ऑगस्ट महिन्यात काही गावात साधारण एक-दोन मलेरियाचे रूग्ण आढळून येऊ लागले. ह्या महिन्यात ४५ गावांतील एकूण १२००० लोकसंखेपैकी २२ मलेरियाचे रूग्ण आढळून आले. मलेरियाची चाहूल लागली होती. मलेरियाचे प्रमाण इथून पुढे वाढणार हे लक्षात आले, व त्यानुसार आम्ही आमची जय्यत तयारी सुरु केली. MMU ऑफिसला war रूमचे रूप दिले. दरवर्षीच्या अनुभवाप्रमाणे कोंदावाही व त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये मलेरियाचे प्रमाण खूप जास्त असते. म्हणून ह्या गावांच्या महिन्यात एकऐवजी दोन-दोन भेटींचे नियोजन केले. औषधे, मलेरियाचे गावातल्या गावात तात्काळ निदान करण्यासाठीचे RDK(Rapid Diagnostic Kit) हे सुद्धा मुबलक प्रमाणात आधीच उपलब्ध करून घेतले होते. सोबतच लोकांमध्ये जागृतीसाठी आम्ही गावा-गावात आरोग्यशिक्षण करण्याचेही नियोजन केले. मालेरीया war साठी लागणारी सगळी हत्यारे आमच्याकडे होती.
             सप्टेंबर महिना आला. आता शत्रू बळकट होत चालला होता. ह्या महिन्यात मलेरियाच्या रुग्णांची संख्या एकदम २२ वरून ११९ वर गेली व ऑक्टोबर मध्ये ही संख्या ११४ वर राहिली. आता आम्ही थोडे अधिक सतर्क झालो. आमचे प्रयत्न सुरूच होते जास्तीत जास्त रुग्णांना उपचार करण्याचे.
            नोहेंबर महिना सुरु झाला. पहिल्याच दिवशी कोंदावाही ह्या गावात गेलो तिथे तर ५०० लोकसंख्येत तब्बल ७१ मलेरियाचे रूग्ण आढळून आले. आता परिस्थिती फारच गंभीर होत चालली होती. सर्चच्या रुग्णालयात सुद्धा रूग्णांची संख्या वाढत होती व मेंदूच्या मलरियाचे रूग्णसुद्धा आता आढळून येऊ लागले.
            आम्ही आमच्या war रूम मध्ये बसून कुठल्या गावात मलेरियाचे प्रमाण अधिक आहे हे शोधून काढलं. ह्यादरम्यान वेळोवेळी योगेश दादचे मार्गदशन मिळतच होते. मलेरियाग्रस्त गावांसाठी विशेष कृती कार्यक्रम आखला. आम्ही तातडीने दंतेश्वरी सेवकांचे शिबीर आयोजित केले. त्यात त्यांना मलेरियाच्या वाढत्या प्रमाणाची व त्यावर नियंत्रण व निदान करण्याची तसेच गंभीर रूग्ण ओळखून सर्चला रेफर करण्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या गावात मलेरियाचे प्रमाण कुठे जास्त आहे हे जाणून घेऊन आम्ही आमची भेट प्राधान्यक्रमाने त्या गावांत देण्याची तयारी केली. त्या गावांत २ भेटी द्यायच्या ठरवल्या. मलेरियाचे आरोग्यशिक्षण केले व मच्छरदाणीचा वापर करण्यास आम्ही लोकांमध्ये जनजागृती केली. निरीक्षणातून असे लक्षात आले की मच्छरदाणी ही भारीत करण्याची (औषधीत बुडविण्याची) खूप गरज आहे. दर सहा महिन्यांनी मच्छरदाणी भारीत करावी लागते. भारीत न केलेल्या मच्छरदाणीचा उपयोग होत नाही. त्यासाठी आम्ही शासनाकडे डेल्टामिथ्रीन नावाच्या औषधाची मागणी केली. (या औषधाचा उपयोग मच्छरदाणी भारीत करण्यासाठी होतो. हे औषध शासनामार्फतच मिळू शकते.). धक्कादायक बाब म्हणजे ऐन मलेरियाच्या साथीत शासनाकडे हे औषधच उपलब्ध नव्हतं. तसेच ACT ची लहान मुलांसाठीची एकही गोळी शासनाकडे उपलब्ध नव्हती. ACT हे औषध PF मलेरियाच्या उपचारासाठी देतात. सर्चने वर्तमानपत्रे व टीव्ही न्यूज चॅनल्स यांच्यामार्फत आवाज उठवल्यानंतर शासनाने डेल्टा मिथ्रीन त्वरित उपलब्ध करून दिले. प्रत्येक गावातील दंतेश्वरी सेवकाला हे औषध देण्यात आले व गावातील मच्छरदाण्या भारीत करण्याचे काम त्यांनी केले.
            नोहेंबर महिन्यात सगळ्यात जास्त ४१० रूग्ण आढळून आले. ह्या सगळ्याचा उपचार करण्याचा दिव्य अनुभव आम्ही घेतला. आता मालेरियाचे प्रमाण भरपूर कमी आहे. मलेरियाचे प्रमाण जास्त का अढळले? तर ह्यावर्षी पाऊस हा उशिरा अनियमित आला व त्यामुळे मच्छरवाढीला अनुकूल असे वातावरण होते.
            ह्या मलेरिया नियंत्रण कार्यक्रमात माझे खूप मोठे पब्लिक हेल्थचे शिक्षण झाले. मोठ्या प्रमाणावर एखाद्या रोगाचे नियंत्रण कसे करावे हे शिकायला मिळाले. टीमवर्क किती महत्वाचे आहे हे सुद्धा लक्षात आलं. निर्माणच्या ५.२ शिबिरात जे मलेरिया, डायरिया इ. आजारांचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी जे ग्रुप Presentation केले ते काम प्रत्यक्ष करण्याची संधी ह्यातून माला मिळाली. शिबिरादरम्यान किंवा शिकत असताना रोगचिकित्सा व त्याच्या नियंत्रणाबद्दल लिहिणे, वाचणे व त्याविषयी बोलणे मजेशीर व कधी-कधी भीतीदायक असते. परंतु प्रत्यक्षात तो एक संघर्ष असतो. परंतु तो वेगळाच आनंद व समाधान आपल्याला देवून जातो.

 स्रोत: भूषण देव, drbhushandeo@gmail.com

No comments:

Post a Comment