'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 13 June 2013

लोकसंघर्ष मोर्चातर्फे निर्माणींचा रचनात्मक व संघर्षात्मक कामात सहभाग

लोकसभागातून ग्रामविकास


लोकसंघर्ष मोर्चा व लोकसमन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने निमड्या ता. रावेर जि. जळगाव येथे ७ दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 'लोकसभागातून ग्रामविकास'च्या धर्तीवर ह्या शिबीरामध्ये काम करण्यात आले. शिबीरामध्ये एकूण् ३२ युवा मित्र मैत्रिणींनी सहभाग घेतला होता. गावातील १४० जणांनी व शिबिरार्थ्यांनी ५ दिवस श्रमदान करून ५ वनराई बंधारे व वृक्षारोपणासाठी ७०० खड्डे खोदले तसेच दुपारच्या वेळी रोज प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 'पर्यावरणपूरक जीवन शैली' यावर हर्षद काकडे (निर्माण ४), 'वनव्यवस्थापनाचे महत्व व फायदे'- आनंद भालेराव, 'सेंद्रीय शेती व त्याचे फायदे'- भूषण वानखेडे (निर्माण ४), 'ग्रामीण भागातील महीलांचे आरोग्य'- विद्या बोदडे तसेच ' लोकसहभाग व ग्रामविकास'- शाम पाटील (निर्माण ४) यांनी प्रबोधन केले. तसेच People Biodiversity register (लोक जैवविविधता नोंद) याविषयीचे प्रशिक्षण घेण्यात आले.

वनकायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी आदिवासींचे आंदोलन


वनकायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करून तत्काळ वैयक्तिक, सामूहिक वनदावे मंजूर करून पट्टे मोजणी करावी, अपात्र दाव्यांची फेरचौकशी करून वनजमिनी मिळाव्यात यासह विविध १५ मागण्यांबाबत लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी बांधवांनी जळगाव, चोपडा, यावल व रावेर येथे आंदोलन केले. या सर्व ठिकाणी भरउन्हात आदिवासी बांधव ठिय्या मांडून होते.

या आंदोलनामुळे महसूल व पोलीस प्रशासनाची धांदल उडाली. जळगावला हल्लाबोल आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला भरदिवसा कुलूपलावण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. तर चोपडा येथे सकाळी ११.३० वाजेपासून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. प्रांताधिकार्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी सात वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. यावल येथे तहसील व आदिवासी विकासप्रकल्प कार्यालयावर सुमारे चार तास घेराव घालून आंदोलन केले. रावेर येथे आंदोलनादरम्यान चार महिला बेशुद्ध पडल्या.

No comments:

Post a Comment