'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 13 June 2013

पेटलेले पाणी: जळगाव पाणी परिषदेत निर्माणींचा सहभाग

जळगाव जिल्हा हा नेहमीच दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. कमी पाउस व त्यातच शासनाचे दुर्लक्ष यामुळे दरवर्षी पाण्याची टंचाई ठरलेलीच असते. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज झालेली असून पाणी बचतीबरोबरच समाजामध्ये जलसाक्षरता निर्माण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. ह्याच उद्देशाने, जळगाव येथे दिनांक १४ व १५ मे ला जळगाव महानगरपालिकेतर्फ़े पेटलेले पाणीया विषयावर आयोजित पाणी परिषद संपन्न झाली. परिषदेचे उद्घाटन राजस्थानातील जलक्रांतीचे जनक राजेंद्रसिंह यांच्या हस्ते झाले. या परिषदेत सायली तामणे, ज्ञानेश मगर (निर्माण ४) व रश्मी महाजन (निर्माण ५) सह्भागी झाले होते.
ह्या दोन दिवसीय परिषदेत पहिल्या दिवशी श्री. राजेंद्रसिंह यांनी २१व्या शतकातील नद्यांच्या पुनरुज्जीवनाची गरज, पारंपारिक जलस्त्रोतांचे महत्व तसेच जळगाव जिल्ह्यातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासंबंधी मार्गदर्शन केले. श्रीमती संध्या एदलाबादकर यांनी शहरात कुठल्या प्रकाराच्या पाणी समस्या भेडसावतात, त्या समस्या उद्भभवण्यामागची कारणे व त्यावरील उपाययोजना यासंबंधी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवासाच्या शेवटच्या सत्रात बजाज ऑटो येथील ज्येष्ठ व्यवस्थापक श्री. मुकुंद बडवे यांनी बजाज ऑटो, औरंगाबाद येथे पाण्याचा पुर्नवापर व पाणी बचतीसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी समान पाणी वाटप चळवळीचे नेते श्री भरत कावळे, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे श्री. प्रांजल दि़क्षित, राष्ट्रविकास संस्थेचे श्री. भूपेन्द्र महाले व बायफ़ संस्थेचे श्री. सुधीर वाघळे यांनी मार्गदर्शन केले व या क्षेत्रात काम, प्रयोग करताना आलेले अनुभव कथन केले. विविध विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञाकडून मिळालेल्या माहितीमुळे हा एक समृद्ध अनुभव होता.

No comments:

Post a Comment