'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 9 May 2013

सृष्टीत...दृष्टीत...



मला आता सगळं कळतंहे मी बौद्धीक आणि नैतिक भ्रष्टतेचे लक्षण मानतो. महावीरांच्या बाबतीत एक किस्सा सांगतात. महावीर त्यांच्या प्रत्येक प्रवचनात कदाचितहा शब्द फार वापरायचे. उदा. असे केले तर कदाचित तुला हे कळेल. ज्ञानप्राप्ती झालेला हा एवढा थोर अध्यात्मिक नेता त्याच्या ज्ञान किंवा अनुभवाविषयी इतका लवचिक होता. मला एवढेच माहित आहे. यापलीकडे नक्कीच अनेक गोष्टी असू शकतात. असे महावीर नम्रपणे लोकांना सांगत होते.
बाह्य सृष्टी आणि आतली दृष्टी! सृष्टी दृष्टीला घडवते की दृष्टी सृष्टीला ह्याचा शोध घेत घेत माणसाने मोठ्ठं तत्वज्ञान (Mind vs. Matter) उभे केले आहे. सुरुवातीला सृष्टी माणसाच्या दृष्टीवर नक्कीच वर्चस्व गाजवत असते. भोवतालच्या व्यक्ती आणि वास्तव त्याच्या जाणीवा घडवत असतात. पण माणसाचा विवेक जागृत झाल्यावर सृष्टीचा प्रभाव ओसरतो आणि तो निकोप दृष्टीने सृष्टीकडे बघायला लागतो. मग दृष्टी सृष्टीला प्रभावित करायला, बदलायला लागते. 
माझ्या आजूबाजूला अत्यंत भणंग, अमानवी अवस्थेत जगणार्या  समाजातल्या वंचित, शोषित घटकासाठी मी काहीतरी केले पाहिजे ह्या तारुण्यसुलभ उर्मीतून मी पाच वर्षांपूर्वी सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला. त्या निर्णयामागे वैचारिक स्पष्टतेपेक्षा भावनिक उर्जा जास्त होती असे आता जाणवते. अर्थात त्यावेळी भावनांचीच गरज जास्त होती. कारण काही कठीण निर्णय घ्यायचे होते. विचार बाळबोध असले आणि पद्धती माहिती नसल्या तरी उद्देश्य डोक्यात पक्का होता – “हे बदलायचं आहे”.
मी सामाजिक क्षेत्रात प्रवेश करण्याचे कळीचे निमित्त झाले ते निर्माण प्रक्रिया. निर्माण प्रक्रियेने समाजातल्या प्रश्नांना बघण्याची, भिडण्याची एक दृष्टी त्यावेळी दिली. त्या दृष्टीत जसा एक ठोस विचार होता तसा प्रेमळ ओलावा सुद्धा होता. ज्येष्ठांनी कठीण विचार दिला पण मोठ्या प्रेमाने. निर्माण मधील मित्रांची प्रेमळ साथ फारच पक्की होती. शिवाय सोबतीला जगावेगळी स्वप्ने होती. त्यामुळे निर्णय घ्यायला फार वेळ आणि त्रास झाला नाही.
मागील पाच वर्षांच्या प्रवासाचे तीन टप्पे सांगता येतील - गडचिरोलीत सर्च संस्थेसोबत सव्वा दोन वर्षांचा पहिला टप्पा. मग नाशिक येथे प्रगती अभियान संस्थेसोबत एक वर्ष आणि मुंबईतील टीआयएसएस या कॉलेजात दोन वर्षे. या तीनही टप्प्यांना जोडणारा एक धागा होता रोजगार हमी योजनेची (NREGA) अंमलबजावणी सुधारणेचे  काम.   
जग घडवण्याचं-बदलण्याचं काम नेते (leaders) करतात. फार थोडे जाणीवपूर्वक नेत्यांचा मार्ग अनुसरतात. त्यात अधिक सुधारणा करतात आणि हातभार लावतात. उरलेले बाकी सगळे मेंढरं असतात. सर्चचे नेतृत्व विचारांनी गांधीवादी. लोकांकडे जा. त्यांना स्वत:चे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम करा. राज्यसंस्थेवर अवलंबून राहू नका. (गांधीजींना राज्यसत्ता मान्यच नव्हती)”. अशी नेतृत्वाची दृष्टी. तशीच सर्चची कार्यपद्धतीची सृष्टी निश्चित झालेली. प्रगती अभियानचे नेतृत्व विचारांनी सुधारणावादी (liberal). लोकशाही चौकटीतील राज्यसंस्थेचे अस्तित्व मान्य असणारे. एकीकडे लोकांना स्वत:चे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम करत त्यांना लोकशाही व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी सुद्धा सक्षम करा. लोकांचे प्रश्न निर्माण करण्यात राज्यसंस्थेचाच मोठा वाटा आहे. त्यामुळे ते सोडवण्यासाठी राज्यसंस्थेसोबत, रचनात्मक आणि संघर्षात्मक दोन्ही प्रकारे, काम करण्याला पर्याय नाही. शिवाय ज्या स्केलवर लोकांचे प्रश्न सोडवण्याची गरज आहे ते काम खाजगी क्षेत्र किंवा एनजीओ करु शकत नाही.अशी प्रगती अभियानची दृष्टी आणि त्यातनंच संस्थेची कार्यपद्धती आकारास आलेली.         
रोजगार हमीच्या प्रश्नावर काम करतांना त्या त्या टप्प्यावर ह्या दोन्ही दृष्टीकोनांचा माझ्यावर मोठा प्रभाव होता. या दोन संस्थांच्या नेतृत्वाने आणि कार्यपद्धतीने रोजगार हमीच्या प्रश्नाला अभ्यासण्याचा आणि भिडण्याच्या माझ्या दृष्टीला नक्कीच प्रभावित केले. पण मला काम करतांना कधी पूरक तर कधी विरोधी अनुभव येत गेले. शिवाय याहून वेगळ्या दृष्टी असलेल्या इतर अनेक व्यक्ती आणि शासकीय/अशासकीय संस्थांचा कामानिमित्त अधिक परिचय झाला.      
कामात फार गुंतण्याचा एक धोका असतो, त्याकडे तटस्थपणे न बघता येण्याचा. मी टीआयएसएस मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी गेलो. तिथे माझ्याकडे तसे काम कमी होते. त्यामुळे तटस्थपणा जास्त होता. तिथे जाऊन कळायला लागलं की निरनिराळ्या विचारधारा (Ideology) माणसाच्या दृष्टीला घडवतात किंवा बिघडवतात. सामाजिक प्रश्नांना अभ्यासण्याच्या, भिडण्याच्या पद्धती विचारधारेतनं येतात. यातल्या प्रत्येक विचारधारेची कार्यपद्धती वेगळी. उद्दिष्टे मात्र जवळपास समान माणसाच्या आर्थिक आणि सामाजिक उत्थानाची. पण तरीही एकमेकांविषयी कमालीची असहिष्णूता भरलेली. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची तीच पूर्वग्रहदूषित दृष्टी.
मला आता सगळं कळतंहे मी बौद्धीक आणि नैतिक भ्रष्टतेचे लक्षण मानतो. महावीरांच्या बाबतीत एक किस्सा सांगतात. महावीर त्यांच्या प्रत्येक प्रवचनात कदाचितहा शब्द फार वापरायचे. उदा. असे केले तर कदाचित तुला हे कळेल. ज्ञानप्राप्ती झालेला हा एवढा थोर अध्यात्मिक नेता त्याच्या ज्ञान किंवा अनुभवाविषयी इतका लवचिक होता. मला एवढेच माहित आहे. यापलीकडे नक्कीच अनेक गोष्टी असू शकतात. असे महावीर नम्रपणे लोकांना सांगत होते.
गांधीवादी, समाजवादी, भांडवलवादी, आंबेडकरवादी, स्त्रीवादी, माओवादी, सुधारणावादी, क्रांतीवादी, वगैरे अशी सगळीच मंडळी विकासाच्या प्रश्नांबाबत आपापले दावे करत असतात. या प्रत्येकाच्या बोलण्यात काही तथ्य आहे पण ते अपूरे आहे. प्रत्येकजण आपापल्या सोयीचा पुरावा निवडत आणि दाखवत असतो. प्रत्येकाची विचारधारा ही त्यांच्यासाठी देव बनली आहे, ज्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांना पुराव्याची गरज नाही. असलीच तर ते सोयीचा पुरावा गोळा करतात किंवा सांगतात. ही तर वैचारिक गुलामी झाली. असे गुलाम मला विद्यापीठांमध्ये दिसतात आणि सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा भेटतात. ते जसे समवयीन असतात तसे ज्येष्ठ सुद्धा असतात. ज्येष्ठांकडे जसे ज्ञान आणि अनुभव असतो तशी झापडं सुद्धा असतात.
विकासाचे प्रश्न फार गुंतागुंतीचे आहेत. त्यांचे अतिसुलभिकरण (over-simplification) करुन चालणार नाही. विकासाच्या परस्पर विरोधी कल्पना किंवा मतप्रवाहांच्या जंजाळात आपण हरवून जाऊ नये म्हणून स्वतंत्र आणि पूर्वग्रहरहीत दृष्टीची गरज आहे. स्वतंत्र, पूर्वग्रहरहीत दृष्टीने सृष्टीला बघण्यासाठी, बदलण्यासाठी नीरक्षीर विवेक अंगी बाणवता आला पाहिजे. त्यासाठी बुद्धीला शास्रकाट्याची धार आलीच पाहिजेत. विकासाच्या प्रश्नांकडे बघण्याची आपली दृष्टी शास्त्रीय असली पाहिजे. टीआयएसएस मध्ये असतांना माझ्यासोबत सर्वोत्तम काही घडले असेल तर ते म्हणजे सामाजिक शास्त्रांचा आणि विवेकनिष्ठ मानसशास्त्राचा परिचय. विकासाच्या प्रश्नांना समजून घेण्यासाठी, भिडण्यासाठी मला आता सामाजिक शास्त्रे मदत करतात तर माणसांना समजून घेण्यासाठी विवेकनिष्ठ मानसशास्त्र उपयोगी पडते.
थोडक्यात सांगायचे तर विकासाच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची नितांत गरज आहे असे मला वाटते. एक, समस्यांकडे बघण्याची स्वतंत्र, व्यापक दृष्टी (perspective) आणि दोन, क्षमता बांधणी (Knowledge and skills). आपले प्रयत्न योग्य दिशेने
आहेत ना ते तपासण्यासाठी व्यापक दृष्टी हवी आणि त्या दिशेने जोमाने पुढे जाण्यासाठी विशिष्ट विषयातील ज्ञान आणि कौशल्ये हवी.

(प्रस्तृत लिखाणाचा उद्देश सामाजिक क्षेत्रातील माझ्या ५ वर्षांतील अनुभवांची/शिक्षणाची सविस्तर मांडणी करणे नसून आपण सामाजिक प्रश्नांना काय दृष्टीने बघतो हे अधोरेखीत करणे असा आहे. विकासाच्या प्रश्नांना बघण्याची आपली दृष्टी कुठून येते? कशी बनते? ती स्वतंत्र, वस्तुनिष्ठ आणि पूर्वग्रहरहित आहे का? की पोथीनिष्ठ आहे, भाड्याने घेतली आहे? अशा प्रश्नांची छानणी काही व्यक्तिगत अनुभवांमधून करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे.)
गोपाल महाजन

No comments:

Post a Comment