'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday 5 April 2013

सीमोल्लंघन, मार्च २०१३


सौजन्य: हृत्गंधा देशमुख

दुष्काळ समजून घेताना ...





दुष्काळाच्या संपूर्ण चित्राकडे पाहता फक्त एक मोठा गुंताच समोर दिसतो. त्याची सुरुवात कुठे व शेवट कुठे, cause कुठला व effect कुठला हे कळेनासे झाले आहे. मोठाले विरोधाभास एकत्र नांदातांना दिसतात. ह्याचे मूळ कशात आहे ?  बदलत्या जीवनशैलीत की महत्वाकांक्षेत की राजकारणात की हे निसर्गाचे चक्रच आहे ? मी ह्याला किती कारणीभूत आहे ? आणि जर असेन, तर आत्ता ह्या घडीला मी काय केले पाहिजे


महाराष्ट्रात ह्यावर्षी पडलेला दुष्काळ हा सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे.  ह्या दुष्काळाचा अभ्यास करताना पुढे आलेले चित्र – माणसे, घटना, संकल्पना व आकडेवारी मांडण्याचा हा छोटा प्रयत्न –
दुष्काळाची दाहकता –
राज्यातील एकूण गावे – २५, २४०
पाण्याचा पुरेसा पुरवठा नसलेल्या गावांची संख्या – ११, ८०१ (४६.७५ %)
दुष्काळग्रस्त गावे १,५८६ , दुष्काळग्रस्त वाड्या -- ,३०५ , एकूण (२३.३३ %) 
दुष्काळग्रस्त चौदा जिल्हे – नगर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, बुलढाणा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, सांगली, सातारा, पुणे

अवर्षण की दुष्काळ ?
अवर्षण म्हणजे पाऊस कमी / न पडणे. दुष्काळ म्हणजे रोजच्या गरजांसाठी पाणी उपलब्ध नसणे. जरी अवर्षणाचा दुष्काळाशी संबंध असला तरी अवर्षण झाले म्हणजे दुष्काळ पडतोच असे नाही. खरंतर 1 – 2 वर्ष अवर्षण झाले तरी जमिनीच्या आत अनेक वर्षांपासून झिरपलेल्या पाण्यावर (groundwater) माणसाला जागता येते, मात्र जमिनीच्या आत झिरपलेल्या पाण्याच्या खूप जास्तप्रमाणात उपसा झाल्याने, पाण्याची उपलब्धी अत्यंत कमी झालेली दिसते. तसेच उस, केळी इत्यादि खूप पाणी लागणारी पिके घेणे, बेसुमार वृक्षतोड, पाण्याचा अतीवापर, जीवन शैलीतील बदल, वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण ह्या सर्व मानवीय कृतींनी अवर्षणापासून दुष्काळापर्यंतचा प्रवास सुलभ केला आहे.
ग्रामीण दुष्काळ
चारा छावणी
शहरी दुष्काळापेक्षा ग्रामीण दुष्काळाचे चित्र जरा वेगळे असते. शहरी दुष्काळात पाण्याची चणचण सामान्य जनतेला फक्त स्वत:च्या कुटुंबाच्या रोजच्या गरजा पुरवण्यापुरती जाणवते. ग्रामीण भागात मात्र पाणी शेतीसाठी, जनावरांना पाजण्यासाठी तसेच जनावरांच्या चार्‍याची सोय करण्यासाठी देखील लागते. पाण्याभावी कित्येक शेतकर्‍यांना आपली जनावरे विकावी लागतात ! दुष्काळग्रस्त भागात सरकारला जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्या लागतात.
राज्यात सुरू असलेल्या चारा छावण्या -- ४८८
चारा छावण्यात दाखल जनावरे -- ,१४,२०५   

औद्योगिकीकरण व दुष्काळ
वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे सिंचन प्रकल्पांतील शेतीसाठीचे पाणी उद्योग आणि शहरांची तहान भागवण्यासाठी वळवले जाते. Economic survey 2011 -12 नुसार गेल्या १० वर्षात सिंचांनाखालील जमिनीत फक्त ०.१ % टक्क्याने वाढ झाली आहे. शहरे आणि उद्योगांच्या विस्ताराबरोबर त्यांची पाण्याची गरज वाढत आहे. मिनरल वॉटर, मद्यनिर्मिती, औषध निर्मिती, पेंट शॉप, इलेक्ट्रोकोटींग, पावडर कोटींग आशा उद्योगांसाठी पाणी हाच कच्चा माल असल्याने त्यांची  पाण्याची गरज जास्त आहे.  
राज्यातील उद्योगांसाठी पाण्याचा वापर (प्रतिदिन) -- १२७.६ कोटी लिटर

पाणी पुरवठयातील विषमता –
शहरी भागास ग्राह्य एकूण पाणीपुरवठा – १३५ ते १५० लिटर प्रती माणशी प्रती दिन
पुण्यातील सहकार नगर भागाला ७३८ लिटर प्रती माणशी प्रती दिन एवढा पुरवठा होतो
शहरी भागातील शौचालयासाठी लागणारा पाणीपुरवठा – ४५ लिटर प्रती माणशी प्रती दिन
ग्रामीण भागास ग्राह्य एकूण पाणीपुरवठा – ४० लिटर प्रती माणशी प्रती दिन

भूजल पातळी व उपसा :
वीज व बोरवेलचे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे भूजलाचा अनिर्बंध उपसा होताना दिसतो.  उस्मानाबाद मधील सर्व ८ तालुक्यांमध्ये भूजल पातळी सरासरीपेक्षा ३ मीटरने खालावली आहे. तसेच औरंगाबादमधील नऊ पैकी आठ व नगरमधील १४ पैकी १० तालुक्यांमध्ये अशीच भूजल घाट दिसते.
मराठवाड्यातील ७६ पैकी ६४, नाशिक विभागातील ५४ पैकी ५० तर पुणे विभागातील ५७ पैकी ४६ तालुक्यांमध्ये भूजल पातळी सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात खालावली आहे.
केस स्टडी – निर्माण ४ च्या चिंतामणी पवारच्या मारापूर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर ह्या २३०१ लोकसंख्या असलेल्या गावात ३५० बोरवेल आहेत. बोरवेलला आता ९०० ते ११०० फुट खोल  पाणी लागते.         

ऊस उत्पादन व साखर कारखाने
ऊस उत्पादनासाठी लागणारे पाणी (प्रती एकर) – १८ दशलक्ष लिटर प्रती एकर
१८ दशलक्ष लिटर पाणी हे ३००० ग्रामीण कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे पाणी आहे
महाराष्ट्रातील साखर कारखाने हे दिवसाला ९० लक्ष लिटर पाणी वापरतात
जलाशयांमध्ये उपलब्ध पाणी – टीएमसी मध्ये  ( १५ फेब्रुवारी पर्यंत )
विभाग
२०११
२०१२
२०१३
मराठवाडा
१६०.७५
९५.१०
३५.५१
नाशिक
९७.५३
७६.५६
५५.१७

Tankers
दुष्काळग्रस्त भागात सरकार तर्फे तसेच पैसे देऊन प्राइव्हेट tankers पुरवले जातात. हे tankers कधी प्राइव्हेट विहिरी व बोरवेल वापरून पैसे देऊन भरले जातात तर कधी दूरच्या नद्या, धरण, तलावातून फुकट भरले जातात. पाण्याचे खूप मोठे मार्केट दुष्काळामुळे खुले झाले आहे. बर्‍याच ठिकाणी सरकार ने पाठवलेल्या tankers पैकी खूप tankers हे फक्त कागदोपत्रीच राहतात.
महाराष्ट्रातील एकूण पाणीपुरवठा करणारे सरकारी tankers – २०२०


जालना एक केस स्टडी
जालन्याला पाणी-पुरवठा करणारा घाणेवाडी तलाव कोरडा पडला आहे
जालना शहराला गेल्या ८ ते १० वर्षांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. मात्र शहरातील पाणी पुरवठ्यात नियोजनाचा अत्यंत अभाव दिसून येतो. शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेतील ३५ ते ४० % पाणी बेकायदेशीर कनेक्शन्स व गळतीमुळे वाया जाते. सद्य परिस्थितीत जालन्याला ४० ते ५० दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो आहे. ह्याचा हिशेब केल्यास जालन्याला दर दिवशी दर माणशी १५ लीटर (फक्त) पाणी मिळत असल्याचे दिसते. जालन्याला पूर्वीपासून घाणेवाडीच्या तलावातून पाणी मिळत असे. मात्र तो तलाव कोरडा पडल्याने (१९३५ सालापासून त्यातील गाळ उपसला नव्हता) जायकवाडी धरणातून शहागड बंधारा व तेथून जालना शहर असा पाणी पुरवठा
होत आहे. जायकवाडीतून ५ टीएमसी पाणी सोडले असता केवळ ३ टीएमसी पाणी जालना शहराला पोहोचते. मधील प्रवासात २ टीएमसी पाणी हे राजकारण्यांच्या  साखरकारखान्यांकरिता वळवले जाते. Tanker ला १००० लिटर मागे ५०० रुपये ह्या दराने एका घरामागे महिन्याभारासाठी १५००० रुपये पाण्यासाठी पडतात. एकट्या जालनाशहरातील tanker मालक दिवसाला ६ ते ७.५ दशलक्ष रुपयाची विक्री दर दिवशी करतात. जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण गाळाने भरलेले असून प्रदूषित पिवळ्या हिरव्या रंगाचे पाणी पिण्यास नागरिक भाग पडत आहेत.
या विहिरीचे हिरवे पिवळे प्रदुषित पाणी
पिण्यासाठी वापरले जात आहे
मात्र त्याच जालना शहरात २२ bottled water चे कारखाने जोमात सुरू आहेत.  ह्या कारखान्यात दर एक लिटर मागे २.५ लिटर पाणी वाया जाते. तसेच जालन्यापासून १५ मिंनिटांवर असलेल्या कडवंची येथे जलसंधारणामुळे द्राक्षाची बाग फुलल्याचे दिसून येते.    
कोरडे पडलेले जालन्याचे जलशुद्धीकरण केंद्र
पाण्याची इतकी वाईट परिस्थिती असतांनाही सिव्हील सोसायटी कडून विरोध फारसा पहायला मिळत नाही. ह्याला दोन कारणे सांगितली जातात. पहिले म्हणजे लोकांना आता पाणीटंचाईची सवय झाली आहे. कमी पाण्यात भागवणे आता लोकांना अंगवळणी पडले आहे. दुसरे कारण जास्त रंजक आहे. जालन्यात नेहमीच कमी पाणी असल्यामुळे जालन्यातील मिडलक्लास हा जालन्यात न राहता नोकरीसाठी अप डाउन करणे श्रेयस्कर समजतो. त्यामुळे जालन्यात बहुतांश लोक हे अती श्रीमंत किंवा अती गरीब असेच पहायला मिळतात. त्यामुळे विरोध करू शकणारा मध्यमवर्ग जालन्याच्या प्रश्नाशी एकरूप होत नाही.  
दुष्काळाची झळ सगळ्यात जास्त महिला व मुलांना जाणवते आहे. गरीब घरांतील मुलांना शाळेत न जाता पाण्याच्या शोधात वणवण करणे निशिबात येत आहे. ह्यासगळ्याचा त्यांच्या आरोग्यावर, शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. कदाचित पुढील दहा वर्षांनी तो आ वासून आपल्या समोर उपस्थित होईल.     
           
दुष्काळाच्या संपूर्ण चित्राकडे पाहता फक्त एक मोठा गुंताच समोर दिसतो. त्याची सुरुवात कुठे व शेवट कुठे, cause कुठला व effect कुठला हे कळेनासे झाले आहे. मोठाले विरोधाभास एकत्र नांदातांना दिसतात. ह्याचे मूळ कशात आहे ?  बदलत्या जीवनशैलीत की महत्वाकांक्षेत की राजकारणात की हे निसर्गाचे चक्रच आहे ? मी ह्याला किती कारणीभूत आहे ? आणि जर असेन, तर आत्ता ह्या घडीला मी काय केले पाहिजे ?
स्रोत – चैतन्य पिंपरकर, केतन जवने, अक्षय लोढा, निरंजन तोरडमल, सचिन तिवले, मनीष देवरे, सायली तामणे, सकाळ अग्रोवन व द हिंदू वृत्तपत्र   
संकलन व शब्दांकन: सायली तामणे

निर्माणी डॉक्टरांच्या मदतीने सर्चमध्ये शस्त्रक्रिया शिबीर संपन्न


सर्चमध्ये नुकतेच झालेले शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी करण्यात निर्माणच्या तरुण डॉक्टरांनी मोलाची भूमिका बजावली. सांगली, कोल्हापूर व अकोला येथून आलेले शल्यविशारद व भूलतज्ञ यांच्यासोबतच निर्माणचे अभिजीत सफई, महेश पुरी, श्रेयस गोडबोले, अभिषेक, आरती गोरवाडकर, रश्मी गायकवाड, तरू जिंदाल, ऋतुजा आणि सर्चचे निवासी डॉक्टर्स व नर्सेस यांच्या अथक परिश्रमांतून गडचिरोली व आजूबाजूच्या जिल्ह्यांमधल्या ग्रामीण भागातील ८५ रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. 

महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशनतर्फे आयोजित जलसंधारणावर आधारित कार्यशाळेत निर्माणच्या तरुणांचा सहभाग


MKCLच्या महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशन (MKF) तर्फे दुष्काळावर काम करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या फेलोशिप उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण या विषयावर जालना जिल्ह्यातील खरपोडी येथे विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तीन दिवसांच्या या कार्यशाळेत संतोष गवळे, जयश्री कलंत्री आणि ग्रामविकासात काम करणारे जालना, नंदुरबार जिल्ह्यांतील ३० कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शेताच्या प्रत्येक छोट्या तुकड्याच्या पातळीवर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या तत्त्वाने जलसंधारण कसे साधता येईल हा कार्यशाळेचा प्रमुख विषय होता. भूजलपातळी वाढवण्यात मातीचे महत्त्वाचे योगदान असते. त्यामुळे जमिनीचा उतार, पावसाचे प्रमाण यांचा विचार करून शास्त्रशुद्ध पद्धतीने शेतात पाणी अडवण्यासाठी मातीचे बांध कसे घालावेत या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले गेले. यानंतर पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असताना मातीचे बांध घालून द्राक्षाचे भरघोस पीक घेणाऱ्या कडवंची गावात भेटीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या अखेरीस प्रत्येकास आपापल्या गावातील किती शेतकरी अशा प्रकारचा बांध घालायला तयार आहेत, किती मोठा बांध घालायचा व त्यासंबंधीची आवश्यक आकडेवारी कार्यशाळेच्या आयोजकांकडे सुपूर्त करण्याची जबाबदारी देण्यात आली.
संतोष आणि जयश्री ग्रामविकासाच्या, विशेषतः पाणीप्रश्नावर यवतमाळ जिल्ह्यातील आपल्या मन्याळी गावात मागील दोन ते तीन वर्षे काम करत आहेत. या कामाचा एक पुढचा टप्पा म्हणून या दोघांना या कार्यशाळेचा त्यांच्या गावाला नक्कीच उपयोग होईल. 

लोकसहभागातून ग्रामविकास: ‘लोकसंघर्ष मोर्चा’ने आयोजित केलेल्या अभ्यासवर्गात खानदेश गटाचा सहभाग


 
‘लोकसंघर्ष मोर्चा’च्या वतीने दि. १९ व २०मार्च रोजी जळगाव जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी गावांचा मेंढा(लेखा) च्या धर्तीवर विकास व्हावा, तेथील वन्यजीव विविधतेचे संरक्षण व्हावे व सहजीवनाची संकल्पना अधिक वृध्दींगत व्हावी यासाठी दोन दिवसीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत कल्पवृक्ष, पुणे या संस्थेच्या कार्यकर्त्या नीमा पाठक व त्याच्या सहकारी मीनल तत्पती यांनी मार्गदर्शन करताना गौणवनाचे संरक्षण, उपभोग्य संसाधनांचा शास्त्रोक्त पध्दतीने वापर व  संवर्धन ह्याकरीता लोकांचा सहभाग हा महत्त्वपूर्ण घटक असल्याचे, तसेच स्थानिक लोकांसोबत चर्चाविनिमय करून आपल्या जमिनीसोबतच आपण जंगल व तेथील जैवविविधताही अबाधित ठेवणे शक्य असल्याचे सांगितले. त्यासोबत मेंढ्यात होणाऱ्या विकासामध्ये मोलाचा सहभाग असणारे प्रा. विजय एदलाबादकर यांनी जैवविविधता नोंदणीपत्रक (People’s Biodiversity Register: PBR) याविषयी माहिती दिली व प्रत्यक्ष अमंलबजावणीविषयी मार्गदर्शन केले.
अभ्यासवर्गात यावल, रावेर व चोपडा तालुक्यातील प्रत्येकी एक गावासाठी प्रायोगिक तत्त्वावर कृतीकार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. अभ्यासवर्ग यशस्वी होण्यासाठी शाम पाटील, हर्षद काकडे, आनंद, भुषण, योगेश, विजय व स्वप्नील यांनी सहकार्य केले.