'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 30 April 2024

युवांपुढचा सगळ्यात कळीचा प्रश्न?

युवांच्या मनात स्वत:विषयी, स्वत:च्या भविष्याविषयी काय प्रश्न आहेत? ते याबाबत काय विचार करताहेत हे कसे जाणून घ्यावे? गडचिरोलीला शोधग्राम येथे होणार्‍या आमच्या निर्माण शिबिरांमध्ये भारतातील 21 राज्यांतून विविध प्रकारची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमी असलेले तरुण-तरुणी येतात. हे युवा भारतातील 26 कोटी युवांचे पूर्णत: सार्वत्रिक प्रतिनिधी नसलेत तरी त्यांच्या मनोविश्वात डोकावून बघितल्यास व्यापक युवामानसाबद्दलची काही झलक आपल्याला समजायला मिळू शकते. किमान हे तरी नक्कीच कळू शकेल की ज्या युवांना स्वयंविकासाची व सामाजिक योगदानाची इच्छा आहे आणि त्यासाठी जे स्वत:हून निर्माणसारख्या उपक्रमात भाग घेऊ पाहतात अशा युवागटाच्या मनातील प्रश्न, संभ्रम, उद्दिष्ट्ये काय आहेत.

याच विचाराने आम्ही एक छोटा अभ्यास केला. 3 वर्षांच्या काळात झालेल्या वेगवेगळ्या निर्माण शिबिरांमध्ये ज्यांनी भाग घेतला अशा 492 ‘युनिक’ युवांना प्रत्येक शिबिराच्या सुरुवातीला आम्ही विचारले की तुमच्या मनात सध्या स्वत:च्या जीवनाविषयी नेमके कुठले प्रश्न आहेत, तुम्ही कशाची उत्तरे शोधता आहात हे कृपया लिहून काढा. हे सर्व ‘रिस्पॉन्सेस’ आम्ही संगणकात नोंदवले आणि गुणात्मक विश्लेषणासाठी त्यांची सात विविध ‘कॅटेगरीज’ / गटांमध्ये विभागणी केली. 492 युवांनी लिहिलेल्या एकूण 6100 प्रश्नांची गटवार विभागणीची टक्केवारी ही सोबतच्या ‘पाय चार्ट’ प्रमाणे होती. यामध्ये सोयीसाठी सातपैकी तीन सगळ्यात छोट्या गटांना’ इतर’ या गटात एकत्र केले आहे. जे चार प्रमुख गट आहेत त्यांत प्रत्येकी काही उपगट देखील आहेत आणि त्यानुसार माहितीचे ‘कोडिंग’ करण्यात आले आहे. परंतु शब्दमर्यादेमुळे ते गटनिहाय अधिक विस्तृत चित्र इथे मांडण्याचे मी टाळतो आहे.



6100 ही 492 युवांनी लिहिलेल्या एकूण सर्व प्रश्नांची बेरीज आहे. प्रति व्यक्ती प्रश्नांची सरासरी ही 12.4 आहे. हे प्रश्न वाचतांना तरुण-तरुणींच्या मनात काय सुरु आहे याचा एक सुंदर रंगपट आपल्या पुढे उभा राहतो.

सर्व प्रश्नांचा एकत्र विचार केला असता सगळ्यात जास्त वेळेस विचारला गेलेला प्रश्न म्हणजे अस्तित्वात्मक व आध्यात्मिक गटामधील ‘माझ्या जीवनाचा उद्देश्य काय? माझा नेमका पर्पज काय?’ हा प्रश्न! खरं तर या बाबत आश्चर्य वाटायला नको कारण हा जीवनातला सर्वात कळीच्या प्रश्नांपैकी एक आहे. आणि 18 ते 29 वर्षातील ‘इमर्जिंग ऍडल्टहूड’चे वय हे या प्रश्नाच्या शोधासाठीचे सर्वात उत्तम वय आहे. 5 आणि 10 वर्षांच्या मुलांना सहसा माझा पर्पज काय हा प्रश्न पडत नाही. इयत्ता बारावीपर्यंतची आपल्याकडची परीक्षार्थी घोडदौड देखील मुलांना या प्रश्नापासून दूर ठेवते. मात्र त्यानंतर, कॉलेजच्या आणि कामाला सुरुवात केल्याच्या वर्षांत हा प्रश्न अनेकांना प्रथमच भेडसावायला लागतो. युवावस्थेत देखील मेंदूची वाढ व विकास होतच असते आणि आयुष्याविषयी, विश्वाविषयी, स्वत:च्या अस्तित्वाविषयी गंभीर प्रश्न पडायला सुरुवात होते (किमान होऊ शकते) असे याबाबतीतले विज्ञान सांगते. जणू काही युवांचा मेंदू या ‘ऍबस्ट्रॅक्ट’ प्रश्नांना भिडण्यासाठी सज्ज होत असतो. मात्र हा शोध घ्यायला मदतरुप होईल असे वातावरण, संधी, वेळ, आणि गरज भासल्यास मार्गदर्शन हे युवांना पुरेशा प्रमाणात मिळते का?

आपल्याकडचे बहुतांश महाविद्यालयीन शिक्षण हे भारंभार माहिती देते, क्वचित प्रसंगी काही कौशल्ये देते. पण एक गोष्ट जवळपास कुणालाच मिळत नाही ती म्हणजे पर्पज. मी घेत असलेल्या या माहितीचा आणि (जर मिळाले असतील तर) कौशल्यांचा उपयोग मी कोणासाठी, कशासाठी करु याची काही नेमकी स्पष्टता फारशी कोणाजवळच नसते. इतकेच नाही तर ही स्पष्टता मिळवण्यासाठी वेळ देणे, विशेष प्रयत्न करणे हे देखील अमान्य असते. घरची मंडळी, शिक्षक तसेच इतर सहाध्यायी या सगळ्यांचाच भर असतो तो लवकरात लवकर पुढची कुठली तरी पदवी घेण्यावर. पर्पजच्या अभावात माहितीचे अधिकाधिक भेंडोळे आणि किमान कुठली तरी कौशल्ये मिळतील या (भाबड्या) आशेने तरुण-तरुणींचा चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू होतो. पुढचा क्लास, परीक्षा किंवा पदवी मिळवण्याच्या सततच्या शर्यतीत मला नेमके कुठे जायचे आहे याचा विचार व शोध कुठच्याकुठे मागे पडून जातो. कदाचित त्यामुळेच एखाद्या विषयाच्या खोलात जावे, कोण्या प्रश्नाच्या झपाटून मागे लागावे हे देखील आपल्या कॉलेज तरुण-तरुणींमध्ये फार कमी प्रमाणात दिसते आणि त्यांचे रोजचे दिवस तात्पुरते मन रमवण्यासाठी नेटफ्लिक्स, यू ट्यूब, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍप मध्येच चालले जातात.

शिक्षणतज्ञ आणि सायकॉलॉजिस्ट आर्थर चिकरिंग त्याच्या ‘एज्युकेशन अँड आयडेंटिटी’ या पुस्तकात तरुण वयातले विकासाचे सर्वात महत्त्वाचे असे जे ‘व्हेक्टर्स’ (सदिश) मांडतो त्यामध्ये स्वत:च्या पर्पजचा शोध घेणे याचा समावेश आहे. चिकरिंग असे देखील नोंदवतो की अनेक तरुण विद्यार्थी हे छान सजून तयार आहेत (ड्रेस्स्ड अप) पण कुठे जायचे हे मात्र त्यांना माहिती नाही आहे. त्यांच्यात ऊर्जा आहे पण त्यांना गंतव्यस्थानाची कल्पना नाही आहे.

निर्माणमध्ये येणारे सुमारे 40% युवा हे भारतातल्या उत्तमोत्तम वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी असतात. बारावीनंतर मोठ्या मेहनतीने आणि आशेने मेडिकलला प्रवेश मिळवणार्‍या या तरुण विद्यार्थ्यांना एकदा का ते कॉलेजमध्ये आले की मग मात्र मी डॉक्टर का बनतोय, आरोग्य क्षेत्रात सध्या महत्त्वाची अशी कुठली आव्हाने आहेत, मी शिकत असलेल्या दवाखान्यात येणार्‍या रुग्णांच्या काय समस्या आहेत, वैद्यकीय ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया काय, या क्षेत्रात ज्यांनी अफाट काम केले आहे असे पूर्वसूरी कोण, मी माझ्या जीवनकाळात नेमके कोणासाठी, कुठे, कशा प्रकारे काम करु शकतो इ. प्रश्नांविषयी विचार करायला, त्यांचा शोध घ्यायला कुठलेही प्रोत्साहन, वेळ वा तसे मार्गदर्शन करणारे ‘मेंटर्स’ मिळत नाहीत. एमबीबीएसला आल्या आल्या आता नीट पीजीची तयारी कशी करायची, कुठला क्लास लावायचा यात ते बूडून जातात. मला ही फार मोठी शोकांतिका वाटते.

हार्वर्ड विद्यापीठातील व्यवस्थापनाचे सुप्रसिद्ध प्राध्यापक क्लेटन क्रिस्टनसन असे म्हणतात, “इफ यंग पीपल टेक द टाईम टू फिगर आऊट देयर लाईफ पर्पज, दे विल लुक बॅक ऑन इट ऍज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दे डिस्कव्हर्ड. बट विदाऊट अ पर्पज, लाईफ कॅन बिकम हॉलो”. युवांच्या एकंदरीत ‘फ्लरिशिंग’ साठी जे विविध घटक कारणीभूत ठरतात त्यातील पर्पज / जीवनहेतू हा सगळ्यात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे.

जयप्रकाश नारायण असे म्हणायचे की ‘अध्यात्म ये बुढापे की बुढभस नहीं तो तारुण्य की उत्तुंगतम उडान है’. युवांच्या पुढचा कळीचा प्रश्न हा निव्वळ उपजीविकेचा नाही तर जीविकेचा आहे, या जीवनाचे काय करु हा आहे. माझ्या जीवनाचा उद्देश्य काय हा आध्यात्मिक प्रश्न आहे आणि याचा शोध उतारवयात नाही तर ऐन तारुण्यातच घ्यायला हवा. त्यातच खरी मजा आहे आणि तरुण असण्याचे प्रात्यक्षिक आहे.

हा शोध घेण्यासाठीची उंच भरारी मारायला आपण युवांना मदत करणार की त्यांचे पंख छाटणार?



अमृत बंग
लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

#युवांना स्वत:च्या पर्पजविषयी विचार करायला चालना मिळावी म्हणून निर्माणने भारतातील प्रथमच अशी एक ‘यूथ पर्पज प्रश्नावली’ विकसित केली आहे. ही मराठी व इंग्रजीमध्ये पूर्णत: ऑनलाईन उपलब्ध असून https://nirman.mkcl.org/selection/selection-process या संकेतस्थळावर बघता येईल.

Thursday 29 February 2024

‘यूथ फ्लरिशिंग’ म्हणजे काय?

माझा मुलगा अर्जुन सध्या अडीच वर्षांचा आहे. जन्मल्यापासून आतापर्यंत अर्जुनची वाढ योग्य रीतीने होते आहे की नाही हे बघण्यासाठी पिडिऍट्रिक्सच्या आणि बालमानसशास्त्राच्या विज्ञानाने बाळाच्या वाढीचे आणि विकासाचे विविध टप्पे व लक्षणे सांगितलेली आहेत. त्या मैलाच्या दगडांनुसार अर्जुनची किंवा इतर कुठल्याही बाळाची वाढ तपासता येते. सर्व छान सुरू असेल तर आनंद मानायचा आणि जर कुठे कमतरता असेल तर त्यावर योग्य ती उपाययोजना करायची ही संधी पालकांना (आणि पाल्याला) उपलब्ध असते.

जर लहान मुलांसाठी ही सोय आहे तर मग या देशातल्या 26 कोटी युवांसाठी काय? त्यांचे सर्व आलबेल चालू आहे की नाही हे (त्यांनी व इतरांनी) कसे ओळखायचे? त्यावर गरज असल्यास उपाययोजना कशा करायच्या? मुळात योग्य ‘ट्रीटमेंट’ साठी प्रथम योग्य ‘डायग्नोसिस’ कसे करायचे?

दुर्दैवाने आपल्या देशात युवांच्या विकसनासाठी पुरेसे काम केले जात नाही आहे. शासन युवांकडे निव्वळ मतदार म्हणून किंवा रोजगारासंबंधीच्या एखाद्या योजनेचे लाभार्थी म्हणून बघते तर खाजगी क्षेत्राचा युवांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा संभाव्य ग्राहक यापुरता सीमित असतो. सामाजिक क्षेत्रात देखील बहुतांश वेळा ‘युथ डेव्हलपमेंट’ हा तुलनेने गौण महत्त्वाचा विषय मानला जातो. सीएसआरद्वारा केल्या जाणार्‍या मदतीमध्ये सुद्धा युवाविकासासाठी काम करण्याला फारसे प्राधान्य दिल्या गेल्याचे दिसत नाही. एकूणच युवांच्या विकासासाठी आपल्याकडे फारसे जोमदार उपक्रम तर नाहीतच पण अत्यंत महत्त्वाची एक समस्या म्हणजे यासाठीचे कुठलेही सिद्धांतन वा प्रारूप देखील भारतात नाही. त्यामुळे एखाद्या युवाचा सुयोग्य विकास म्हणजे नेमकं काय, तो होतो आहे किंवा नाही, त्याची विविधांगी सक्षम जडणघडण होते आहे की नाही, हे कसे ओळखायचे याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात व अस्पष्टता राहते.

या संदिग्धतेचा परिणाम असा होतो की मग निव्वळ सहजरीत्या दृष्यमान (दर्शनीय!) आणि विनासायास मोजता येण्यासारखे असे जे विकासाचे मापक असतात उदा. परीक्षेतील मार्क्स, डिग्री वा कॉलेजचे नाव, नोकरी, पगार, घर वा गाडी असणे, इ. त्यांनाच प्राधान्य मिळते. आणि जणु याच बाबी म्हणजे युवा विकासाचे मापदंड व मानदंड आहेत असा समज प्रस्थापित होतो. त्यांचेदेखील काही महत्त्व आहे हे निर्लक्षून चालणार नाही पण ही मानके म्हणजेच परिपूर्ण असेदेखील मानता येणार नाही. मग असे इतर काय घटक, लक्षणे, वैशिष्ट्ये असू शकतात ज्यावरून याची कल्पना करता येईल की एखाद्या युवाचे जीवनात खरोखर छान सुरु आहे, तो किंवा ती “फ्लरिश” होत आहे, युवा विविधांगाने बहरताहेत आणि विकासाच्या / वाढीच्या मार्गावर इष्टतम स्थितीत आहेत? यासाठीचे काही बुद्धीगम्य आणि सैध्दांतिक प्रारूप नसेल तर सखोल समज देखील शक्य नाही आणि परिणामकारक उपक्रमांची कल्पना सुचणे वा ते प्रत्यक्षात आणणे, त्यांचे मोजमाप करणे हे देखील अवघड!

युवांच्या विकासासंबंधीचा आपल्याकडील बहुतांश संवाद व चर्चा ही आत्महत्या, बेरोजगारी, अपघात, लैंगिक अत्याचार, मादक पदार्थांचे व्यसन, मोबाईलचा अतिवापर याभोवतीच घोळते. या सहा मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन आम्ही निर्माण या आमच्या उपक्रमाद्वारे भारतातील युवांसाठी प्रथमच असे एक “निर्माण यूथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क” तयार केले आहे. हे प्रारूप गेल्या 17 वर्षात हजारो युवकांसोबतच्या आमच्या कामातून आणि अनुभवातून झालेल्या निरीक्षणांवर तसेच या विषयाबाबतच्या नवीनतम विज्ञानावर आधारलेले असे आहे. या फ्रेमवर्कची व्याप्ती व्यापक असून त्यात 7 मुख्य विभाग आणि त्यामध्ये एकूण 50 विविध घटक अशी विभागणी आहे. क्रिएटिव्ह कॉमन्सच्या अंतर्गत लायसन्स केलेले हे विस्तृत फ्रेमवर्क निर्माणच्या संकेतस्थळावर https://nirman.mkcl.org/media/nirman-youth-flourishing-framework येथे बघता येईल.

यातील 7 मुख्य विभाग म्हणजे: 
1. शारीरिक स्वास्थ्य - Physical Health, 
2. मानसिक स्वास्थ्य - Psychological Well-Being, 
3. चारित्र्य विकास - Character Development, 
4. नातेसंबंध - Social Relationships, 
5. व्यावसायिक विकास - Professional Development, 
6. जीवन कौशल्ये - Life Skills आणि 
7. सामाजिक योगदान - Social Contribution


या फ्रेमवर्कचा ज्यांना उपयोग होईल असे 4 श्रोतृगट आमच्या नजरेसमोर आहेत:

1. युवांना फ्लरिशिंगच्या या रंगपटावर मी सध्या नेमका कुठे आहे हे शोधता यावे म्हणून तयार केलेली ‘निर्माण यूथ फ्लरिशिंग प्रश्नावली’ देखील निर्माणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संपूर्णत: ऑनलाईन अशी ही प्रश्नावली भरल्यानंतर त्यावर आधारित 5 पानांचा रिपोर्ट प्रत्येकाला त्याच्या इमेलवर मिळतो. युवा स्वत: याचा वापर करून स्वत:च्या बहुआयामी विकासाची सद्यस्थिती काय, पुढील उद्दिष्ट्य काय आणि त्यासाठी सुरुवात कशी करता येईल याचा विचार करू शकतात. स्वत:च्या फ्लरिशिंगची जबाबदारी स्वत: घेऊन त्याबाबतीत स्वयंपूर्ण बनू शकतात.

2. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थांच्या सर्वांगीण व्यक्तित्व विकासावर भर द्यावा असे सुचवण्यात आले आहे. त्यानुसार विविध कॉलेजेसमध्ये या प्रश्नावलीचा वापर करून अध्यापक मंडळी विद्यार्थ्यांना मदत करू शकतात. डिग्रीच्या अभ्यासासोबतच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक वैयक्तिक ‘ग्रोथ प्लॅन’ तयार करू शकतात. प्लेसमेंट्सच्या वेळी तांत्रिक कौशल्यांसोबतच आपल्या व्यक्तित्व (character) आणि व्यक्तिमत्वाविषयी (personality) देखील विद्यार्थी नेमकेपणे बोलू शकतील अशी तयारी करून घेता येईल.

3. संशोधक व धोरणकर्ते या फ्रेमवर्क मधील विविध घटकांवर संशोधन, त्यांचे विष्लेषण, उपयुक्त ज्ञाननिर्मिती, शिफारसी, इ. वर काम करू शकतात. यातून उद्या काही नवीन घटकांचा समावेश देखील या फ्रेमवर्कमध्ये होऊ शकतो.

4. युवांसोबत संबंध येणारा इतर कुठलाही सुजाण भारतीय नागरिक – पालक, नातेवाईक, भावंड, शिक्षक, सल्लागार, गट प्रमुख, कंपनीतील बॉस वा वरिष्ठ सहकारी, मित्र, जोडीदार – या फ्रेमवर्कचा उपयोग करुन त्याच्या/तिच्या संपर्कात येणाऱ्या युवांच्या विकासात हातभार लावू शकतो.

निर्माण म्हणून आम्ही असे भविष्य बघू इच्छितो जिथे भारतातील तरुणाईची प्रगती व उत्कर्ष यांची संकल्पना ही, त्यांच्या व इतरांच्या विचारातदेखील, परीक्षेचे मार्क्स, पॅकेजचे आकडे, मालकीच्या गाड्यांची संख्या अथवा चौरस फुटामधील मालमत्तेचा आकार, या पलीकडे जाते आणि वैविध्यपूर्ण स्वरूप घेते.

मानसिक वा शारीरिक आजारांचा निव्वळ अभाव म्हणजे आपोआप निकोप व निरोगी वाढ असा अर्थ होत नाही. त्यातून फक्त इतकेच कळते की आपण अक्षाच्या ऋण बाजूला नाही आहोत तर शून्य बिंदूवर आहोत. अक्षाच्या धन बाजूला, सकारात्मक वाढीसाठीच्या अगणित संभावना आहेत. त्या शक्यतांना वास्तवात आणणे ही युवा पिढीची जबाबदारी आणि आपण बाकी सगळ्यांचे उत्तरदायित्व आहे. या प्रवासामध्ये हे फ्रेमवर्क उपयुक्त मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा करतो.

या फ्रेमवर्कवर आधारित आम्ही केलेल्या युवांच्या अभ्यासावरील शोध निबंधाची येत्या जून महिन्यात अमेरिकेत होणार्‍या ‘कॉन्फरन्स ऑन इमर्जिंग अॅडल्टहूड’ मध्ये सादरीकरणासाठी निवड झाली आहे. भारतातील युवांच्या व्यक्तित्व विकासाबाबत केल्या गेलेला हा या प्रकारचा पहिला अभ्यास आहे. यापासून सुरुवात होऊन हळुहळु भारतातील युवांच्या विकासाबाबतचे भारतीय परिप्रेक्ष्यातील विज्ञान आणि त्यावर आधारित नीती व उपक्रम विकसित होतील अशी मला आशा आहे.

शेवटी फ्लरिशिंग युवा हेच फ्लरिशिंग भारताचे खरे चिन्हक व पताका असतील आणि देशाच्या भरभराटीचे इंजिन असतील!


अमृत बंग

लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

वरील लेख हा 'लोकसत्ता' या वृत्तपत्रात संपादित सदरामधील एक लेख आहे.

amrutabang@gmail.com

Wednesday 31 January 2024

युवा कसे जगत आहेत?

भारतात 18 ते 29 वर्षे या वयोगटात 26 कोटी युवा आहेत. पण ते काय करत आहेत, त्यांचा रोजचा दिवस कसा जगत आहेत, हे युवा स्वयंविकासाच्या इष्टतम स्थितीत आहेत का? अत्यंत कळीचे असे हे प्रश्न समजून घेण्यासाठी प्रथम काही उदाहरणे बघुयात.

श्रावणी चंद्रपूरची. स्वत:ची इच्छा नसतांना देखील आई-वडीलांचा आग्रह म्हणून तिने त्यांनी सांगितलेल्या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आता तिला फार पैसे मिळतील अशी नोकरी लगेच सापडत नाही आहे. आई-वडील म्हणताहेत की तू पुण्याला जा आणि स्पर्धा परीक्षांचे क्लासेस लाव. तिची ती देखील इच्छा नाही. कुठे शिकाऊ उमेदवारीचे काम करावे यासाठी ती वा पालक दोघेही तयार नाहीत. परिणामत: पदवी संपून दोन वर्षे झालीत तरी श्रावणी घरीच बसून आहे. दिवस कसा जातो तर प्रामुख्याने मोबाईल, इन्स्टाग्राम व युट्यूबवर.

वैभव मुंबईच्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसर्‍या वर्षाला आहे. हॉस्टेलला मुलांमध्ये दारु व गांजा सर्रास चालतात. दुसर्‍या मजल्यावरच्या त्याच्या रूमकडे चालत जात असतांना दोन्ही बाजूला अनेक बाटल्या पडलेल्या दिसतात. मेसमधले जेवण ना स्वास्थपूर्ण ना चवीष्ट. खूपदा बाहेरून स्विगी, झोमॅटोवरून पदार्थ ऑर्डर केले जातात. त्यांचे अर्धवट अन्न उरलेले अनेक डब्बे व पार्सल्स विविध खोल्यांच्या दरवाज्यांबाहेर पडलेले दिसतात. तिथे अनेक उंदीर फिरत असतात. पुरेसे उन व खेळती हवा नसल्याने अनेक कपड्यांना फंगस लागले आहे. पण पोस्टिंगला जायचे असल्यास तोंडावर पाणी व अंगावर भरपूर स्प्रे मारुन चटकन तयार व्हायची कला वैभव व त्याच्या मित्रांनी अवगत केली आहे. ‘हॉस्टेल लाईफ’ हे असे असणारच असे मानून यात काही गडबड आहे असे देखील आता वैभवला वाटत नाही. रोजचे (प्रामुख्याने रात्रीचे) सुमारे 4 ते 5 तास हे वैभव इन्स्टाग्राम रील्स स्क्रोल करण्यात, मिर्झापूर – मनी हाईस्ट सारख्या वेब सिरिज बघण्यात, पब्जी वा इतर गेम्स खेळण्यात घालवतो. तो सहसा रात्री 3 वाजता झोपतो. पुस्तके वाचण्याची तशी वैभवला फारशी सवय नाहीच पण आता मित्राच्या सांगण्यावरून त्याने अंकूर वारिकू यांचे ‘डू एपिक शिट’ हे पुस्तक चाळायला घेतले आहे. कुठलेच वर्तमानपत्र वाचत नसल्याने भारताच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे धनंजय चंद्रचूड आहेत आणि नुकताच इतर न्यायाधीशांना कॉलेजियम पद्धतीने नियुक्ती द्यावी की नाही यावर सरकार आणि कोर्टाचा काही वाद झाला या (व अशा) बाबतीत वैभव पूर्णपणे अनभिज्ञ आहे.

अक्षय बीड जिल्ह्यातल्या एका गावातील हुशार मुलगा. नवोदय विद्यालयात बारावीपर्यन्त शिकून तो आता अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायला औरंगाबादला आला आहे. कॉलेज तर म्हणायला सुरु आहे पण लेक्चर्स व प्रॅक्टिकल्स क्वचितच होतात. आई-वडील वा घरच्या इतर कोणाशीही अक्षयला फारसे नीट बोलता येत नाही, स्वत:च्या भावना नीट व्यक्त करता येत नाहीत. ‘जेवण झाले का, सर्व ठीक सुरू आहे ना’ या भोवतीच बोलणे थांबते. कॉलेजमध्ये दोन-तीन मित्र आहेत पण त्यांच्यासोबतचा संवाद देखील उथळ आहे. आपली घुसमट होते आहे, सतत एकटेपणाची भावना आहे असे अक्षयला वारंवार वाटत असते.

नाशिकच्या अभिनवची एमबीबीसची पदवी पूर्ण होऊन आता तीन वर्षे झाली आहेत. पुढे पीजी करायला हवे, ते देखील रेडियोलॉजी, ओर्थोपेडिक्स वा स्किन याच विषयात असे त्याला वाटते, कारण त्या ब्रांचेसना प्रतिष्ठा आहे, त्यात बक्कळ पैसा आहे असे त्याला सिनियर्सनी सांगितले आहे. दुर्दैवाने यात किंवा इतर कशातही प्रवेश मिळेल एवढे गूण अभिनवला नीट पीजीच्या परीक्षेत मिळत नाही आहेत. तीन वर्षे झालीत तरी तो अद्याप परिक्षाच देत आहे. तोच तोच अभ्यास करून अभिनव कंटाळला आहे. बर्‍याचदा त्याला फ्रस्ट्रेटेड वाटतं. कॉलेजमध्ये फिरतांना लाज वाटते. खोली – लायब्ररी – मेस एवढेच चक्र दिवसभर चालू आहे. 27 वर्षे वय झालं तरी अजूनही त्याचा गुजारा आई-वडील पाठवत असलेल्या पैशांवरच होतो आहे.

जळगावची प्रणाली आता गेली चार वर्षे पुण्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करते आहे. तिला भरपूर पॅकेज आहे याचा तिला झालेला आनंद आता ओसरला आहे पण त्याबाबत तिच्या आई-वडीलांना असलेला अभिमान मात्र अजून कायम आहे. त्याहून किमान दीडपट अधिक कमावणारा मुलगाच प्रणालीकरिता बघायचा असे त्यांनी ठरवले आहे. इकडे प्रणालीला मात्र तिच्या कामात आता कुठलाही उत्साह राहिलेला नाही. रोज पाच कधी वाजतील याची ती वाट बघत असते. ऑफिसमधील सहकारी देखील विकेंडचा प्लॅन काय करायचा याचीच चर्चा करत असतात. दारु पिणे प्रणालीला स्वत:ला फारसे पटत नाही पण सोबतचे मित्र-मैत्रिणी मनसोक्त पितात आणि आपण एकटे पडायला नको म्हणून ती त्यांच्यासोबत पब्सना जात असते. पुण्यातले बहुतांश हॉटेल्स त्यांनी पालथे घालून झाले आहेत. ‘पुण्यात फ्लॅट बूक कर’ असा पालकांचा तगादा सुरू असतो तो तिने कसाबसा आतापर्यंत थोपवून धरला आहे. आपण काही सामाजिक योगदान द्यावे असेही प्रणालीला अधेमध्ये वाटते पण नेमके काय करावे हे काही सुचत नाही.

प्रतीक नांदेडचा. विद्यापीठामध्ये एमएच्या पहिल्या वर्षाला त्याने नाव नोंदवले होते पण मग मध्येच ते सोडले. त्याचा दिवसाचा मुख्य कार्यक्रम म्हणजे इतर दोन मित्रांना घेऊन रोज 50-100 रुपयांचे पेट्रोल भरून त्याच्या यामाहा बाईकवर ट्रिपलसीट फिरणे. त्याला टापटीप कपडे घालायला आवडते. फोटोग्राफरला 200 रुपये देऊन रोज मस्त फोटो काढून घेणे आणि त्याची इन्स्टाग्राम स्टोरी करणे हा त्याचा आवडता छंद. कोणाचे फॉलोअर्स किती व ते कसे वाढवायचे हा तीन मित्रांच्या गहन चर्चेचा नेहमीचा विषय. काम व कमाई यापेक्षा दारु, खर्रा व कॅरम हे जवळचे मुद्दे. आपल्या सारख्या युवांना ‘नीट’ (NEET – Not in Education, Employment or Training) म्हणून संबोधले जाते हे त्यांच्या गावीही नाही. आणि सरतेशेवटी, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा, संदीप. वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडचा. कृषीमध्ये बीएससीची पदवी घेऊन आता चार वर्षे पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. युपीएससी नाही तर किमान एमपीएससी तरी होऊ या इच्छेवर तगणार्‍या लक्षावधी तरुणांपैकी तो देखील एक आहे.

वरील सातही उदाहरणे (नावे बदलली आहेत) हे अपवाद नाहीत तर सध्याच्या युवांच्या सार्वत्रिक स्थितीचे प्रातिनिधिक निदर्शक आहेत.

निर्माण उपक्रमाद्वारे गेल्या दीड दशकात प्रथम महाराष्ट्रातील आणि नंतर भारताच्या 21 राज्यातील हजारो तरुण-तरुणींना भेटण्याची, संवाद साधण्याची, त्यांचे जीवन जवळून पाहण्याची संधी मला आणि निर्माण टीम मधील माझ्या सहकार्‍यांना लाभली. त्यादरम्यान हे सात जण विविध रुपात, तपशीलाच्या काही बदलासह आम्हाला वारंवार भेटलेत. मनापासून वाईट वाटावे अशी ही परिस्थिती आहे.


लहान मुलांच्या शारीरिक कुपोषणाबाबत बर्‍याचदा चर्चा होते, बातम्या होतात, ते योग्यच आहे. पण आपल्या युवांच्या व्यक्तित्व कुपोषणाची काय परिस्थिती आहे याची भनक देखील कोणाला नाही. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे – 5 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 5 वर्षांखालील बालकांमध्ये कुपोषणाचे (stunting) प्रमाण हे 35% आहे. मात्र निर्माणद्वारे आम्ही केलेल्या युवांच्या अभ्यासात युवांमधील व्यक्तित्व कुपोषणाचे (languishing) प्रमाण हे 43% आढळून आले. भारतासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हे लक्षात घेऊन ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल याची चर्चा आपण पुढील लेखात करुया.



अमृत बंग

लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

वरील लेख हा 'लोकसत्ता' या वृत्तपत्रात संपादित सदरामधील एक लेख आहे.

amrutabang@gmail.com

Sunday 28 January 2024

युवा म्हणजे नेमके कोण?

निर्माण उपक्रमाद्वारे गेल्या दीड दशकात प्रथम महाराष्ट्रातील आणि नंतर भारताच्या 21 राज्यातील हजारो तरुण-तरुणींना भेटण्याची, संवाद साधण्याची, त्यांचे जीवन जवळून पाहण्याची, त्यांचे प्रश्न – द्वंद्व – निर्णय – त्यांचे परिणाम बघण्याची आणि त्यांच्या विकासात हातभार लावण्याची संधी मला आणि निर्माण टीम मधील माझ्या सहकार्‍यांना लाभली. बहुतांश वेळा आनंददायी, कधी त्रासदायक पण कायमच शिकवणारा असा हा प्रवास राहिला आहे. या दरम्यानचे आमचे अनुभव व निरीक्षणे, गोळा झालेल्या माहितीचे विश्लेषण आणि सोबतच ‘यूथ सायकॉलॉजी’ या विषयाचे आधुनिक विज्ञान या सगळ्यांचा आधार 'लोकसत्ता' या प्रसिद्ध वृत्तपत्राच्या सदरातील मांडणी करताना मी घेणार आहे.

भारत हा युवांचा देश आहे’ हे आता वापरुन वापरुन गुळगुळीत झालेले वाक्य आहे. पण ‘युवा / यूथ’ म्हणजे नेमके कोण ही मात्र अगदी सर्वज्ञात व सर्वमान्य अशी संज्ञा नाही. ‘यूथ’ या नावाखाली अनेक विविध वयोगट खपून जातात. युनायटेड नेशन्स असो की भारत सरकार, वय वर्षे 13 पासून ते वर्ष 35 पर्यन्तच्या दरम्यानचे अनेक कालखंड (13 ते 35, 15 ते 34, 15 ते 29, 18 ते 24, 18 ते 29, ...) हे युवावस्थेसाठी म्हणून वापरले जातात. यात दुर्दैवाने अजून सार्वमत नाही. व्याख्येचाच गोंधळ असेल तर भारतात नेमके युवा किती याच्या उत्तरांत देखील तफावत येणारच. काही तरी ठोस नेमकेपणा हवा म्हणून निर्माणमध्ये आम्ही 18 ते 29 या वयोगटाला युवा म्हणून मानायचे असे ठरवले आहे (त्यामागची काही वैज्ञानिक व व्यावहारिक कारणे पुढे येतील). या सदरासाठी देखील आपण तीच व्याख्या कायम ठेऊया.

तर 18 ते 29 या वयोगटात भारताची 22% लोकसंख्या आहे. म्हणजे एकूण 26 कोटी लोक! आवाका समजून घ्यायचा तर भारताचे हे 26 कोटी युवा हे आख्या पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येहून जास्त आहेत. या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाला (डेमोग्राफिक डिव्हिडेंड) पाया समजून त्यावर मजबूत उभारणी करणे हे अत्यावश्यक आहे, कारण हा युवा वर्गच देशाचा चेहरा, ताकद आणि भविष्य असणार आहे. 2021 साली भारताचे ‘मिडियन’ वय हे 28 वर्षे होते, म्हणजेच भारताची अर्धी लोकसंख्या ही 28 वर्षांपेक्षा कमी वयाची आणि उरलेली अर्धी अधिक वयाची होती. तुलनेसाठी म्हणून त्याच सुमारास चीनचे ‘मिडियन’ वय हे 37, पश्चिम युरोपचे 45 व जपानचे 49 वर्षे होते. जगातल्या सर्वाधिक तरुण देशांपैकी एक हा भारत आहे. पण सोबतच हे समजून घेणे देखील गरजेचे आहे की ही अमर्यादित काळासाठी उपलब्ध असलेली संधी नाही. 2031 साली भारताचे ‘मिडियन’ वय हे 31 वर्षे होणार आहे आणि त्यापुढे ते अधिकाधिक वाढत जाणार आहे. आपण कोणीच आज जितके तरुण आहोत तितके भविष्यात नसणार, हे जसे आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत वैयक्तिकरीत्या खरे तसेच ते देशाच्या पातळीवर देखील खरे आहे. म्हणूनच युवांच्या बाबतीतली आपली समज वाढणे आणि त्यांच्या सकारात्मक वाढीला, कर्तृत्वक्षमतेला खतपाणी घालणे ही येत्या दशकातली कळीची बाब असणार आहे. हे नीट करता यावे यासाठी युवावस्था नेमकी काय, ती कशी उदयाला आली / येते, तिची प्रमुख लक्षणे (फीचर्स) काय, त्यादरम्यानच्या प्रमुख समस्या काय, इ. बाबतीत आपले समाज म्हणून आकलन विस्तारणे आवश्यक आहे.


अमेरिकेतील क्लार्क विद्यापीठातील रिसर्च प्रोफेसर जेफ्री आर्नेट यांनी 2000 साली ‘अमेरिकन सायकॉलॉजिस्ट’ या प्रख्यात शोधपत्रिकेत लिहिलेल्या निबंधात या मधल्या अवस्थेचे विस्तृत वर्णन करून तिला ‘इमर्जिंग ऍडल्टहूड
’ असे नाव दिले आहे. एरिक्सन यांच्या ‘लाईफस्पॅन थियरी’ मधील पौंगडावस्था ते प्रौढावस्था यांच्या दरम्यानची अशी ही नवीन पायरी आता मानली जात आहे. आर्नेट यांचा हा शोधनिबंध एक मैलाचा दगड ठरला असून त्यानंतर आता इमर्जिंग ऍडल्टहूड हा एक गंभीर अभ्यासाचा विषय बनला आहे. या विषयाला पूर्णत: वाहून घेतलेले आणि दर दोन महिन्यांनी प्रकाशित होणारे इमर्जिंग ऍडल्टहूड याच नावाचे एक जर्नल देखील आहे ज्यामध्ये जगभरातून येणारे शोधनिबंध असतात. दुर्दैवाने जगातील सर्वात जास्त इमर्जिंग ऍडल्ट्स (म्हणजेच 18 ते 29 वयोगटातील आपले युवा अथवा यूथ) ज्या भारत देशात आहेत तिथून मात्र फारच कमी (जवळजवळ नाहीतच) असे या विषयावरचे शोधनिबंध प्रकाशित होतात. भारतासाठीच्या महत्त्वाच्या अशा आरोग्याच्या अनेक प्रश्नांवर (उदा. मलेरिया, टीबी) जसे भारतीयांनी नाही तर पाश्चिमात्य वैज्ञानिकांनी संशोधन केले, तसे काहीसे याबाबतीत व्हायचे नसेल तर आपल्या देशातील संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठे, सामाजिक संस्था, इत्यादींनी आपल्याकडील या 26 कोटी इमर्जिंग ऍडल्ट्स / यूथ / युवांबाबत संशोधन करणे, त्यांना समजून घेणे व त्यांच्या सुयोग्य वाढीसाठी विविध उपक्रम विकसित करणे हे अत्यावश्यक आहे.

जन्मल्यापासून पुढे मनुष्याची वाढ टप्प्याटप्प्याने कशी होते याबाबत मानसशास्त्रामध्ये एरिक एरिक्सन यांची ‘लाईफस्पॅन थियरी’ महत्त्वाची मानली जाते. बालपण ते प्रौढावस्था यांच्या मध्ये पौंगडावस्था (ऍडॉलेसन्स) ही एक पायरी यात मानली गेली आहे. जी. स्टॅन्ली हॉल हे अॅडोलेसन्सच्या वैज्ञानिक अभ्यासाचे जनक मानले जातात. त्यांनी 1904 साली या विषयावर पहिल्यांदा दोन खंडांचे पुस्तक लिहिले. त्यांतर हळुहळु ऍडॉलेसन्स हा घरोघरी वापरला जाणारा शब्द झाला. (हॉल यांच्या इतर दोन विशेषता म्हणजे ते अमेरिकेतील सायकॉलॉजीचे पहिले पीएचडी आणि अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनचे संस्थापक!)

आपण जर ओघाने आपल्या आजी-आजोबा, पणजोबा यांच्या पीढीच्या जीवनप्रवासाकडे नजर टाकली तर असे लक्षात येईल की काही दशकांपूर्वीपर्यन्त माणसे पौंगडावस्थेतून सरळ प्रौढावस्थेत पदार्पण करीत. उच्च शिक्षणाचे प्रमाण फारसे नसे व त्यासाठी फार वर्षे देखील लागत नसत. लग्न व मुलबाळ लवकर होत असे. एकूणच प्रौढ जीवनाच्या जबाबदार्‍या विशीतच स्वीकारल्या जात आणि माणसे कुटुंब व काम यामध्ये चटकन ‘सेटल’ होत असत. 

मात्र हळुहळु हे स्वरूप बदलायला लागले आहे. आता पौंगडावस्था ते प्रौढावस्था असे लगेच संक्रमण होत नसून या प्रवासाला बराच कालावधी लागतोय. उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले असून आजकाल अनेकदा 27 - 28 वयापर्यंत (अनेकदा त्याच्याही पुढे) लोक औपचारिक शिक्षण घेत असतात. लग्न होण्याचे वय वाढत चालले आहे आणि साहजिकच मुले देखील उशिरा होत आहेत. तरुण-तरुणी ‘सेटल’ होण्याआधी विविध पर्याय (कामाचे, जागेचे, जीवनशैलीचे, जोडीदाराचे) ‘एक्स्प्लोअर’ करु इच्छितात व त्यासाठी वेळ घेताहेत. ज्या 18 ते 29 वयोगटाला आपण युवा म्हणतोय त्यातील अनेक जण हे आता ‘ऍडॉलेसेन्ट’ तर नाही पण पूर्णत: ‘ऍडल्ट’ देखील नाही अशा एका मधल्या अवस्थेत आहेत.

बालमृत्युचा प्रश्न पूर्णत: संपला जरी नसेल तरी आपल्या देशासाठी ते आता तेवढे मोठे आव्हान उरलेले नाही. जगण्याची संधी मिळून आता युवावस्थेत पोहोचलेल्या (आणि पुढील वर्षांत येऊ घातलेल्या) कोट्यवधी तरुण – तरुणींना आपण कसे घडवतो, घडायला मदत करतो हा आता आपल्यापुढचा सर्वात कळीचा प्रश्न असणार आहे.

युवावस्थेतील महत्त्वाची लक्षणे काय, यूथ फ्लरिशिंग म्हणजे नेमकं काय, युवांना पडणारे मुख्य प्रश्न कोणते, ‘पर्पज’ ही संकल्पना नक्की काय व युवांसाठी त्याचे महत्त्व काय, करियरची निवड, मूल्यव्यवस्था, आर्थिक गरजा व आकांक्षा, भावनांविषयी जागरूकता व व्यक्त होता येणे, युवा व व्यसने, युवांची सामाजिक जबाबदारी व कृतीशीलता, इ. अनेक विषय या सदरातील पुढील लेखांत आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. त्यातील माहितीचा उपयोग करुन ज्याला अधिक समजून घेता येईल आणि ज्याच्या विकासात योगदान देता येईल असा तुमच्या परिचयातील किमान एक इमर्जिंग ऍडल्ट शोधून ठेवा! भेटूच लवकर! 




अमृत बंग 

लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत. 

वरील लेख हा 'लोकसत्ता' या वृत्तपत्रात संपादित सदरामधील एक लेख आहे. 

amrutabang@gmail.com

Saturday 23 December 2023

लग्न - सहकार की व्यवहार?

मी शिक्षणाने इंजीनियर आहे. कॉलेजच्या प्लेसमेंट्सनंतर मी नागपूरला एका बहुराष्ट्रीय कंपनीत काही काळ नोकरी केली, पण कामाचं समाधान लाभेना, म्हणून मी ती नोकरी सोडली. आणि कित्येक वर्षांपासून मनात साचलेलं, 'समाजासाठी काम करायचंच,' या प्रेरणेनं गडचिरोली जिल्ह्यातील एका मोठ्या सामाजिक संस्थेबरोबर जोडली गेले. गेली पाच वर्ष मी तिथेच काम करत आहे. मला माझं काम आवडतं, त्याचा होणारा दृश्य परिणाम लक्षात येतो, बरोबरीने माझादेखील सातत्यानं विकास होतो आहे, हे जाणवतं आणि मनःपूर्वक समाधान वाटतं. काही आठवड्यांपूर्वीच मी २७ वर्षांची झाले. वाढदिवसानंतर अनेकांनी मला विचारलं, की आता लग्नाचं कायघरीदेखील याविषयी चर्चा सुरू झाली. मी लग्नाला तयार आहे. पण मला चिंता वाटते आहे. आणि भीतीदेखील. 

कारण... 

रुजत आलेलं माझं इथलं काम मला सोडायचं नाहीये. कुणी विचारेल, की मग अडचण कुठे आहे? अडचण समाजधारणेत आहे. मी मुलगी, तरुणी, स्त्री असण्यात आहे.

लग्नानंतर सासरी जाणं, लग्नानंतर मुलीने आपलं घर, कुटुंब आणि त्या घरातील जवाबदाऱ्या सोडून सासरी, नवऱ्याच्या घरी जावं, तिथून पुढे तेच तिचं सासर- म्हणजे घर असणार आहे, अशी प्रथा, मानसिकता अजूनही समाजात रूढ आहे. ती वर्षानुवर्षे आहे हे मान्य; पण म्हणून, मुलीनेच स्वतःचं घर का सोडावं? आपल्या कुटुंबाप्रति असलेल्या कर्तव्यास तिलांजली का द्यावी? करिअर-नोकरीबाबत तडजोड का करावी? हा माझ्यासारख्या मुलींना सातत्याने पडणारा, परंतु अद्याप उत्तर न सापडलेला प्रश्न.

असं म्हटलं जातं, की फार पूर्वीच्या काळात मुबलक प्रमाणात जमीन जिथे उपलब्ध आहे, तिथे पती-पत्नी लग्नानंतर आपला संसार सुरू करायचे. जमीन ही स्थावर असल्यामुळे आणि त्याचा व्यवहार करण्याची यंत्रणा त्या वेळी विकसित न झाल्यामुळे, ज्याच्याकडे जमीन जास्त, त्याच्याकडे संसार सुरू व्हायचा. मुलाकडे जमीन कमी असल्यास मुलगा लग्नानंतर मुलीकडे जायचा आणि जीवनातील नव्या पर्वाला सुरुवात करायचा. उत्तरोत्तर पुरुषप्रधान संस्कृतीचं वर्चस्व वाढलं आणि मुलींच मुलाकडे कायमस्वरूपी जावं, ही प्रथा समाजात रूढ झाली. परंतु वर्तमानात, जिथे  जमिनीचे व्यवहार करणं सुलभ झालं आहे, संपत्ती साठवण्याचे इतर स्रोत उपलब्ध आहेत आणि शिक्षण, आर्थिक क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता येऊ लागलेली असतानाही ही प्रथा का सुरू राहावी?

स्वातंत्र्य; पण लग्नापर्यंतच! 

आज नोकरी-व्यवसायासाठी अनेक तरुण- तरुणी घरापासून दूर जातात. मुंबई-पुणे ही शहरे तर अनेकांना आकर्षित करतात. परंतु 'सासरघरी जायचं' असल्यानं तरुणींना स्वतःच्या नोकरीचं ठिकाण निवडण्याचं स्वातंत्र्य मात्र गमवावं लागतं. पती-पत्नी दोघंही छोट्या शहरातील असल्यास, जर तरुणीला मुंबईला आणि तरुणाला पुण्याला नोकरी मिळाली तर अगदी क्वचित घडणारा अपवाद सोडल्यास त्यांच्यातल्या पत्नीलाच मुंबईतील नोकरीचा पर्याय सोडून पुण्याला नोकरीचा शोध घ्यावा लागतो. माझ्या शेजारी राहाणारी एक प्रेमविवाह झालेली तरुणी. एकाच बिल्डिंगमध्ये राहणारे हे दोघे. लहानपणापासून एकत्र वाढलेले. शिकता शिकता प्रेम जुळलं. दोघंही इंजिनीयर झाले. त्याला दुबईला नोकरी मिळाली. तीन वर्षांनंतर दोघांनी लग्न केलं. दरम्यान, तिलाही मुंबईतच चांगल्या कंपनीत, मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. सध्या ती सासूबरोबर राहते. नवरा लग्नानंतर लगेच दुबईला गेला आणि तो भारतात लगेच परत येणार नाही, हे नक्की झालं. त्यामुळे तिला तिथे नोकरी मिळेल का याची चाचपणी सुरू झाली, कारण तिला नवऱ्याकडे जावं(च) लागणार आहे. याचं कारण तसं गृहीतच आहे. अशा परिस्थितीत नेहमीच 'Adjustment' करावी लागते ती स्त्रीलाच. याचा पाया मुलीच्या लहानपणापासूनच रचला जातो. शिक्षण, मित्रमैत्रिणी, छंद आणि अंतिमतः नोकरी या साऱ्याचं स्वातंत्र्य मुलीला मिळतं... पण अर्थात 'लग्नापर्यंतच'! 'तुला जे करायचं आहे ते कर. पण लग्नानंतर मात्र नवऱ्याच्या, सासरच्या कलानं गोष्टी कराव्या लागतात,' असं अनेक आई-वडील आपल्या मुलीला बिनदिक्कत सांगत असतात. इतर सर्व बाबतींत मुलीला सूट दिली जाते, परंतु लग्नाचा विषय निघाला, की मर्यादांचा पाढा सुरू होतो. मुलांना मात्र स्वातंत्र्य आणि तेही 'लाइफटाइम'. मुलींना निवडक स्वातंत्र्य; तेही लग्नापर्यंतच! मग प्रश्न पडतो, की मुली खरंच स्वतंत्र आहेत का? मुली म्हणून करिअर, इच्छा-आकांक्षा आणि कर्तव्यांचे (कुटुंब आणि समाजाप्रति) काय? या देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून स्वतःची प्रगती करण्याचा, जीवनविषयक किंवा सामाजिक जाणिवांवर काम करण्याचा, त्यानुसार जगण्याचा अधिकार मुलींना नाही का? मुलीनं कायमच त्याग करायचा किंवा तडजोड करायची आणि मुलानं लाभ घ्यायचा. याला लग्न म्हणायचं की एखादी 'वन साइडेड बिझनेस डील'?

भौगोलिक विकासातील असमानतेचा आणि खासगी नोकरीपेक्षा सामाजिक कार्याला कमी समजण्याच्या समाजमान्यतेचादेखील परिणाम होतो. मी स्वतः जर पुण्यात किंवा बंगळूरूला एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करून 'सेटल' होण्याचा निर्णय घेतला आणि तसाच मुलगा हवा, असा आग्रह धरला, तर तो काही प्रमाणात रास्त समजला जाईल. मुलगी 'मॉडर्न' आहे, 'करिअरिस्टिक' आहे असं मानलं जाईल. पण मी जर गडचिरोलीत राहून पूर्णवेळ सामाजिक कार्य करायचं म्हणते आहे तर त्याला मात्र वेडगळपणा समजलं जाईल! इथे येऊन सेटल होणारा मुलगा हवा किंवा त्यानं इथून त्याचं 'वर्क फ्रॉम होम' करावं, किंवा अन्य पर्याय शोधावा, असं जर मी जाहीर केलं, तर ती अवास्तव अपेक्षाच मानली जाईल.

सातत्याने गृहीत धरणं! 

दुसऱ्या एका तरुणीचं उदाहरण पाहूयात. ती ५ वर्षांपासून नोकरी करत आहे. उत्तम काम करत असल्यामुळे तिची प्रगती होतच आहे, परंतु ते काम म्हणजे तिच्यासाठी नुसती नोकरी नाही, तर तिला त्याचा ध्यास आहे, ते तिचं 'पॅशन' आहे. घरी लग्नाचं बोलणं सुरू झालं की मात्र तिला दडपण येतं. तिचं स्वप्न, तिचं करिअर, तिचं काम यांचं काय होणार? कारण आईवडिलांनी ठरवलेलं स्थळ त्यांच्या दृष्टीनं एकदम उत्तम आहे. पण या स्थळाचा आग्रह आहे की तिने नोकरी सोडावी किंवा 'वर्क फ्रॉम होम' करावं. ही एकतर्फी त्यागाची अपेक्षा योग्य आहे का? हा तिचा प्रश्न आहे. आणखी एक उदाहरण. माझ्या ओळखीतल्या एका तरुणीने लग्न केलं. नवरा-बायको दोघांचंही करिअर उत्तम चालू आहे. घरात 'सपोर्ट सिस्टीम' ही उत्तम आहे. त्यामुळे सगळं चांगलं चाललं होतं. अचानक सासूची तब्येत बिघडली तेव्हा पहिली अपेक्षा सुनेने सुट्टी घ्यावी ही होती. नंतर तो आजार जेव्हा गंभीर निघाला, तेव्हा तिनं नोकरीच सोडावी, असा जणू फतवाच निघाला. आईच्या आजारपणात मुलाने रजा घ्यावी किंवा घरातल्यांनी एकत्र बसून त्यावर काही तडजोडीचा उपाय शोधावा, हा विचारच कुणी करू नये? की सेवाभाव बाईलाच जास्त जमतो, तीच योग्य रीतीने काळजी घेऊ शकते, असं गृहीत धरून तिला त्याकामी लावावं? हा कुठला न्याय? खरं तर काळानुसार तरुणांनीही विचार करायला हवा की त्यांच्या संसारासाठी, बायकोसाठी ते काय देऊ शकतात? व्हॉट ही कैन ऑफर टू हिज फॅमिली?

आणखी एक उदाहरण. अश्विनीला वर्षाला १५ लाख रुपयांचे पॅकेज आहे. त्याचबरोबर ती सुगरण आहे, तब्येतीनं 'फिट' आहे, हुशार आहे आणि ऑफिसमध्ये ५ जणांची टीम लीड करते. वयाच्या २८ व्या वर्षी तिच्याकडे एक चारचाकी गाडी आहे आणि नुकताच तिनं एक फ्लॅट बुक केला आहे. मागच्या महिन्यात अश्विनीला घरच्यांनी एक स्थळ सुचवलं. तिलासुद्धा वाटतंय, की आता तिला आवडेल लग्न करायला. 'कांदेपोहे' कार्यक्रमासाठी आलेल्या आशीषला तिने प्रश्न विचारला, "सो, टेल मी आशीष, व्हॉट डू यू प्लॅन टू ऑफर इन धिस रिलेशनशिप?" बापरे! या प्रश्नावर घरात असं काही वादळ उठलं की विचारायलाच नको! खरं तर हा प्रश्न तरुणींनी भावी नव-याला विचारायच्या आधीच तरुणांनी स्वतःलाच विचारायची वेळ आली आहे. स्त्री आता परावलंबी नाही राहिलेली. ती स्वतंत्र होते आहे. तिला तिच्या घरापलीकडे ओळख मिळते आहे. हा प्रश्न कधी समाजाच्या मनात आलाच नाही का की आता कदाचित स्त्रियांच्याही अपेक्षा बदलल्या असतील? त्याही काही वेगळा विचार करत असतील? त्यांच्या काही वेगळ्या मागण्या असतील? आणि का नसाव्यात? या बदलत्या परिस्थितीत जोडीदार म्हणून एक तरुण आपल्या होणाऱ्या बायकोला खरंच काय मूल्यवर्धक गोष्टी देऊ शकतो याचा गांभीर्यानं विचार करायला हवा. इथे कुणी हे विचारू शकेल, की हेच तरुणांच्या बाबतीतही होऊ लागलं आहे. आजकालच्या मुली, अगदी नोकरी न करणाऱ्यासुद्धा खेडेगावांत किंवा फार सोयीसुविधा नसलेल्या ठिकाणी यायला उत्सुक नसतातच. त्यामुळे एखाद्याला अशा ठिकाणी काम करत आयुष्य घालवायचं असेल तर त्याच्या समोरही प्रश्नचिन्ह आहे. हे मान्य आहेच; परंत मुलींच्या बाबतीत हा प्रश्न सध्या प्राधान्याने येतो आहे, कारण मुली आता वेगळं करिअर करू लागल्या आहेत. 

मुलांचंही असावं 'न्यू नॉर्मल!' 

आमच्या संस्थेच्या समुदायातीलच डॉ. सूरज म्हस्के या आमच्या मित्राने वेगळी वाट निवडली आणि थेट ग्रामीण भागात जाऊन सेवाभावी रुग्णालय सुरू केलं. शहरातील आर्थिक भरभराटीचा पर्याय सोडणाऱ्या सूरजला त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी पत्नी, डॉ. जानकी भेटली. या जोडीच्या अगदी उलट म्हणजे माझी एक मैत्रीण डॉ. हर्षा कुमारी आणि तिचे पती. हर्षादेखील एका सामाजिक संस्थेत काम करते. या जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे हर्षाच्य पतीने तिच्यासोबत 'शिफ्ट' होऊन 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वतः निवडला. एकीकडे सुरजबरोबर ग्रामीण भागात, सामाजिक क्षेत्रात आलेली जानकी तिनं निवडलेला पर्याय हा 'अपेक्षित' वाटतो, तर दुसरीकडे हर्षासोबत आलेला तिचा पती- याचं उदाहरण मात्र 'दुर्मीळआहे! अर्थात, दुर्मीळ असलं तरी शक्य आहे आणि मुलांसाठी 'न्यू नॉर्मल'चा पायंडा पाडणारं आहे. मुलांनी 'न्यू नॉर्मल'चा गांभीर्याने विचार केल्यास आणि तरुण-तरुणीने एकत्र चर्चा करून ठरवल्यास अनेक मुलींना कामाविषयी वाटणारी अनिश्चितता नक्कीच कमी होऊ शकेल.

एम. डी. असलेली माझी एक डॉक्टर मैत्रीण- जी आदिवासी भागात गेली ३ वर्ष उत्कृष्ट काम करत आहे. पश्चिम घाटात पर्यावरण संवर्धनाचं काम करत असलेली दुसरी एक 'एम.एस्सी.झालेली तरुणी तिथेच राहून काम करते आहे. मराठवाड्यातील गरजू कुटुंबांतल्या लहान मुलांच्या शिक्षणावर काम करणारी तरुणी, 'सायकियाट्री''एम.डी.' करणारी आणि भविष्यात ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार देऊ इच्छिणारी आणखी एक मैत्रीण... अशा अनेक तरुणी आहेत. यांना आता त्यांचा जिथे जम बसला आहे तिथेच स्थायिक व्हायचं असेल तर त्यांना लग्नाच्या बाबतीत सुयोग्य जोडीदार मिळेलच याची खात्री नाही. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या आणि देशाच्या 'यंग अँड प्रॉडक्टिव्ह वर्कफोर्स'चा (तरुण आणि कार्यक्षम मनुष्यबळाचा) भाग बनणाऱ्या तरुणींचं प्रमाण वाढतं आहे, ही अतिशय आशादायक आणि आनंददायी बाब आहे. मात्र त्याबरोबर सामाजिक क्षेत्र असो, वा खासगी क्षेत्र; तरुणींचं काम आणि त्यांचं करिअर यालादेखील समान प्राधान्य देणं आवश्यक आहे, अविभाज्य आहे. लग्न झालं, की ती तरुणीच फक्त जागा बदलून नवऱ्याच्या ठिकाणी जाईल, तिथे काम शोधेल, त्यानुसार आपलं करिअर 'Adjust' करेल वा बदलेल, अशा अपेक्षा ठेवणं आता बदलायला हवं. ते योग्यही नाही आणि वास्तववादीदेखील नाही. तसा बदल काही प्रमाणात होतो आहे, मात्र तो वाढायला हवाय.

दोघंही नोकरी वा व्यवसाय किंवा वेगळं करिअर करत असतील, तर लग्नाचा निर्णय घेताना आणि जोडीदार निवडताना म्हणजे लग्नाच्या आधीच दोघांना सुसंगत असलेल्या ठिकाणाचा विचार व्हायला हवा. कुणाचं काम कुठे आहे आणि कुठे करणं आवश्यक आहे, कुणाच्या कामाची जागा वा प्रकार बदलणं तुलनेनं सोपं आहे, कुणाच्या कामाचा विशेष सकारात्मक सामाजिक परिणाम घडू शकतो आणि त्यामुळे ते अबाधित ठेवावं, आदी बाबींचा, 'टिपिकल' दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन विचार करणं, हे आता जरुरी आहे.

दोघांकडून योगदान अपेक्षित!  

कोणत्याही नात्यात दोन्ही व्यक्तींकडून प्रयत्न आणि योगदान होणं आवश्यक असतं. लग्न तर दीर्घकाळासाठी जोडलं जाणारं नातं आहे. यात जर नवऱ्याच्या उत्कर्षासाठी त्याची बायको योगदान देत असेल, तर मग तिच्या उत्कर्षासाठी त्याने योगदान द्यायला हवं. त्यामुळे स्त्रियांनाही त्यांच्या स्वधर्माच्या मार्गावर चालणं सुकर होईल आणि एकूणच आपला समाज एका नव्या दिशेनं पुढे जातानाचं चित्र पाहण्याचा आनंद आपल्याला मिळेल.

मी माझ्या कामानिमित्तानं अनेक तरुणींशी चर्चा करत असते. नोकरी करणाऱ्या, न करणाऱ्या, शिक्षण घेत असलेल्या, अनेक जणी लग्नाच्या वयात आल्यानंतरही नवरा नेमका कसा हवा- इथे पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे विचार करणं अपेक्षित- पुढे त्या काय करणार आणि कुठे राहणार, याविषयी संभ्रमात असतात. लग्नानंतर माझं आयुष्य कसं वळण घेईल याविषयी त्यांच्या मनात प्रचंड असुरक्षितता असते. त्या सगळ्यांच्या मनावर समाजाचं एक अदृश्य दडपण आहे. लग्न तर करायचंय, करिअर किंवा वेगळ्या वाटेवर चालायचंही आहे, पण मग समाजाला योग्य वयात लग्न होणंही अपेक्षित असतं, अशा वेळी कशाला महत्त्व द्यायचं?

आपल्या समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्त्रियांची यादी जर आपण पाहिली, तर त्यातील अनेक जणींना त्यांच्या जोडीदाराचा भक्कम पाठिंबा लाभला. मग त्या मुलींच्या शिक्षणासाठी राबणाऱ्या सावित्रीबाई फुले असोत, गडचिरोलीच्या दुर्गम भागात जाऊन स्त्रीरोगांवर अभ्यास करणाऱ्या डॉ. राणी बंग असोत किंवा सुधा मूर्ती असोत! अशी अनेक उदाहरणं आहेतच, मात्र हे केवळ अपवादात्मक न राहता सर्वांसाठी कसं साध्य होईल ते बघणं महत्त्वाचं आहे.

शेवटी, मुलींची सातत्यानं होणारी घुसमट थांबवायची असेल, तर या प्रश्नावर विचार करावाच लागेल, की लग्न म्हणजे सहकार की लग्न म्हणजे व्यवहार

- अदिती पिदुरकर (निर्माण, सर्च)  

aditipidurkar95@gmail.com